Join us

"त्यांनी मला घरी बोलावलं अन्..." शिवाजी साटम यांना लतादीदींनी दिली 'ही' खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 3:35 PM

लोकप्रिय 'CID' या मालिकेमुळे अभिनेते शिवाजी साटम घराघरात पोहचले.

Shivaji Satam : लोकप्रिय 'CID' या मालिकेत शिवाजी साटम(Shivaji Satam) यांनी एसीपी प्रद्युमन ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. शिवाजी साटम यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचा दिसून येतो. अशातच शिवाजी साटम यांनी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

नुकतीच शिवाजी साटम यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दल काही आठवणी शेअर केल्या आहेत. या मुलाखती शिवाजी साटम म्हणाले, "एकदा 'सीआयडी' मधील कलाकारांना लतादीदींनी त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. तेव्हा त्यांनी मला गाणं गाण्याचा आग्रह केला होता. त्यांचं गाण्यावर प्रचंड प्रेम होतं. त्यावेळी लतादीदींनी आम्हाला सगळ्यांना घड्याळं भेट दिली. मस्कतच्या एका डिलरकडून त्यांनी आमच्यासाठी घड्याळे मागवली होती. नुसती घड्याळे भेट नाही दिली तर एसीपी प्रद्यूमन यांच्या हातावर कोणतं घड्याळ शोभेल? तसेच दयाच्या हातावर कोणतं घड्याळ शोभेल? याकडेही त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलं होतं. आम्हाला एपिसोडमध्ये पाहून त्यांना अप्रूपच वाटायचं.आजही मी ते घड्याळ मोठ्या आवडीने वापरतो. शिवाय सीआयडीकरिता त्यांनी माझ्यासाठी टाय देखील मागवल्या होत्या. असा त्यांचा स्वभाव होता".

पुढे शिवाजी साटम म्हणाले, "त्या खूपच ग्रेट होत्या. दिवाळीच्या वेळेला त्यांनी मला दोन शर्ट देखील गिफ्ट केले होते. मी नेहमीच  लतादीदींना म्हणायचो, की त्यांना पाहून मला माझ्या अक्काची आठवण येते. अक्का ही आमच्या सगळ्या भावंडांमध्ये मोठी होती. त्यानंतर दीदीनाथ मंगेशकर पुरस्कार मला मिळाल्यानंतर लतादीदींनी मधील संपूर्ण टीमला पुन्हा घरी जेवणाचं आमंत्रण केलं होतं. तेव्हा त्यांनी छोटं असं चांदीचं ताट सगळ्यांना प्रेमाची भेट म्हणून दिली होती. अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांसोबत त्यांनी नातं जपलं होतं".

टॅग्स :शिवाजी साटमलता मंगेशकरबॉलिवूडमराठी अभिनेता