Join us

अभिनेता योगेश देशपांडेंचे दिग्दर्शनात पदार्पण, '६६ सदाशिव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:58 PM

‘ग्रहण’ फेम योगेश देशपांडे '६६ सदाशिव' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे योगेश देशपांडे. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘ग्रहण’ या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ते मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ६६ सदाशिव असे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारीत पूर्ण झाले असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. 

 मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय पु.लं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमासह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची रुचीही जपली.

त्यांनी यापूर्वी ‘अवंतिका’, पिंपळपान’, ‘रेशीमगाठी’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

आगामी ’६६ सदाशिव’ या चित्रपटाबद्दल बोलताना योगेश देशपांडे म्हणाले, जाहिरात विश्वात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. कॉर्पोरेट फिल्म्स, ब्रँड अॅड फिल्म्सच्या दिग्दर्शनाचा अनुभव होता यामुळे चित्रपट क्षेत्र खुणावत होते, याच दरम्यान ’६६ सदाशिव’ चा विषय सुचला या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळत मी अभिनय सुद्धा केला आहे. चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा आहे, या चित्रपटात प्रतिभावंत, दिग्गज कलाकार दिसणार आहेत, चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर निर्माते आहेत. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन अंतिम टप्प्यात असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.