Join us

निराळ्या संकल्पनेवर आधारित शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडेचा "८ दोन ७५" चित्रपट येतोय १९ जानेवारीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 12:07 PM

चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

एका महत्त्वाच्या व  संवेनशील विषयावर आधारित  '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'  हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी - सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.  

चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. त्याशिवाय आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये  ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने  केली आहे. एका आगळ्यावेगळ्या व संवेदनशील विषयावर आधारित आहे. मात्र चित्रपटासारख्या माध्यमातून या विषयाची हाताळणी कशी केली आहे याबाबत कुतूहल आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 

टॅग्स :संस्कृती बालगुडे