महाराष्ट्रात 'माझी लाडकी बहीण' (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा शुभारंभ सरकारकडून करण्यात आला होता. या योजनेचा जोरात प्रचार झाला. राज्यातल्या मराठी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून सर्वत्र जाहिराती करण्यात आली. अनेक कलाकार मंडळींनीदेखील या योजनेच्या जाहिराती केली. यातच आता अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिनेही तिच्या सोशल मीडियावरुन लाडकी बहिण योजनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण अशी जाहिरात केल्याने तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं.
अमृताने या योजनेच्या जाहिरातीचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता 'माझी लाडकी बहीण' योजनेची जाहिरात करताना दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, अमृताची एक मैत्रीण कैरीचं लोणचं घेऊन येते. कैरीचं लोणचं पाहताच अमृताला आनंद होतो. ती मैत्रीण अमृताला सांगते की हे लोणचं तिच्या एका मैत्रिणीने बनवलंय. लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून तिने हा व्यवसाय सुरू केला आहे. यावर अमृता म्हणते की, माझ्या आवडत्या लोणच्यामागे अशी प्रेरणादायी गोष्ट असेल मला माहितीच नव्हतं. खरंच हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकतंय. हे महायुती सरकार खरंच लोकांसाठी खूप छान काम करतंय.त्यांची ही लाडकी बहिण योजना तर महिलांसाठी खूप छान फरक घडवून आणतेय. यानंतर अमृता लाडकी बहीण योजनेत नाव नोंदवण्याचं आवाहन करताना दिसून येते.
अमृताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "महिलाओं का है एक ही नारा, महायुती सरकार में योग्य सन्मान हमारा". तिने हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. "चंद्रमुखी नंतरचा हा दमदार परफॉर्मन्स", "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती", "तुझ्यासारखी अभिनेत्री असं करेल यावर माझा विश्वास नाही. खूप निराशा झाली...हे फुकटचे पैसे आपले आहेत, त्यांच्या खिशातले नाहीत आणि याचा तू प्रचार करत आहेस हे चूक आहे",'आंब्याचा सीझन कधी होता आणि लाडकी बहिण योजना कधी आली ?? ऑगस्ट मध्ये लागतात का आंबे ' अशा कमेंट करत तिला सुनावलं आहे.