Shraddha Murder Case: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब आमीन पुनावाला याने तिची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना उघडकीस आली. श्रद्धा वालकर ही तरूणी आफताब बरोबर दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. त्यावेळी आफताबने तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणानंतर आफताबबद्दल साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगांवकर हिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मोठी पोस्ट शेअर आहे.
केतकीची पोस्टकेतकीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असं लिहिलं आहे की, 'एक सुंदर जग आई वडील आपल्याला देतात. सुखसोयींनी भरलेलं, आनंदी, परफेक्ट आणि सुरक्षित असं, ज्यात काही चुका नसतात. त्याकडे आपण असंच बघतो कारण जगातील वाईट गोष्टी आपले पालक आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. पण एक चुकीचा निर्णय आणि आपलं आयुष्य बदलतं. श्रद्धा, एक सुंदर तरूणी तिच काय चुकलं? ती फक्त प्रेमात पडली. पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने सर्व काही तिच्याकडून हिरावलं गेलं. काल ही बातमी पाहून माझी झोप उडाली'. 'श्रद्धाच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्या नराधमाला कडक शिक्षा मिळो हिच मनापासून प्रार्थना आणि इच्छा. असं कृत्य पुन्हा होणार नाही असं वचन देऊया'. केतकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये #BelieveButDontTrust असा हॅशटॅगही वापरला आहे.
आफताब दगाफटका करणार याचा श्रद्धाला आधीच आला होता संशयश्रद्धाच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, आफताब श्रद्धाला दगाफटका करू शकतो असा श्रद्धाला आधी संशय आला होता. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने सांगितले, "श्रद्धाचा एके दिवशी मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की तिला त्या घरातून बाहेर निघायचे आहे. जर त्या रात्री ती आफताब बरोबर त्या घरात राहिली तर तो तिला मारून टाकेल. मला श्रद्धाची काळजी वाटली. मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न जुलैपासून करत होतो. तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. तिचा फोनदेखील स्विच ऑफ होता. अखेर तिच्या काही मित्रांकडे चौकशी केल्यानंतर मी तिच्या भावाला फोन केला आणि आम्ही पोलिसात गेलो." तसेच, दुसऱ्या एका मित्राने सांगितले की अफताब श्रद्धाला मारहाण करायचा, असे तिनेच त्याला सांगितले होते.