Ashwini Kulkarni : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 'पछाडलेला' हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंसह भरत जाधव, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, विजय गोखले, नीलम शिर्के यांसारख्या तगड्या कलाकरांची फळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर या चित्रपटात श्रेयसची गर्लफ्रेंड म्हणजेच मनीषाची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने (Ashwini Kulkarni) साकारली होती. या चित्रपटामुळे अभिनेत्री चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटातील तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एका गंभीर विषयावर भाष्य केलं. तिच्या या वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
अश्विनी कुलकर्णीने 'द पोस्टमन' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टदरम्यान तिला विचारण्यात आलं की, समजा एखादा बॉलिवूड सिनेमा आहे ज्याची गेली ६ महिने हवा आहे. त्याची रिलीजची तारीख सुद्धा ठरली आहे. त्याच्यासमोर मराठी निर्माते आपला सिनेमा का बरं उतरवत असतील? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "तेच मला म्हणायचं आहे आणि मग म्हणायचं की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. 'पुष्पा-२' हा माझा आता रिलीज होणार आहे हे जर का मी सहा महिन्यांपूर्वी सांगितलं आहे. तुम्ही त्याच दिवशी जर का तुमचा कुठलातरी एखादा चित्रपट रिलीज करताय आणि मग तुम्ही ओरडताय आम्हाला थिएटर्स मिळत नाही."
पुढे अभिनेत्री म्हणाली, " थिएटर्सवाल्याचा सुद्धा तो त्याचा व्यवसाय आहे. आज तुमचा जर का एखादा व्यवसाय असेल आणि तुला जर का वाटलं की माझ्या या मालाला खूप चांगली मागणी आहे तर तू तोच माल देणार ना. मला हे खूप आवडतं तर तुम्ही हे घ्या, असं सांगून समोरचा घेणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जर थिएटरमध्ये जर 'पुष्पा' लागला तर आणि तेव्हाच एखादा दुसरा सिनेमा लागलाय. ज्याची फार चर्चा नाही आहे. तर मी पुष्पा पाहायलाच जाऊन ना. कारण माझे पैसे वसूल होतात काही नाहीतर अॅक्शन सीन्स, डान्समध्ये वसूल होतात. काहीच नसेल तर अल्लू अर्जूनला बघून वसूल होतात. अजून काय पाहिजे. तो फरक आहेच ना. एक ५०० रुपयांचं तिकिट काढताना हिरोज्म, अॅक्शन वगैरे या सगळ्याचा विचार होतो. त्यामुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं जितकं गरजेचं आहे तितकाच तो योग्य वेळी रिलीज झाला पाहिजे. हेसुद्धा पाहणं गरजेचं आहे." असं अभिनेत्रीने सांगितलं.
वर्कफ्रंट
दरम्यान, अश्विनी कुलकर्णीने चित्रपटांसह मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. 'सख्या रे' या मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसली.