Join us

‘शांती भवन’मधील गूढ रहस्य उलगडण्यासाठी अभिनेत्री लीना भागवत सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 7:35 PM

अभिनेत्री लीना भागवत एका नव्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आल्या आहेत.

चित्रपट, मालिका आणि नाटकांद्वारे प्रेक्षकांवर अभिनयाचे वलय निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री व लेखिका लीना भागवत स्टोरीटेल ओरीजनलच्या ‘शांती भवन’ या ऑडीओ सिरीजद्वारे एक आगळेवेगळे गूढ रहस्य स्टोरीटेल मराठीच्या साहित्यप्रेमींसाठी घेऊन आल्या आहेत. ‘शांती भवन’चे लेखन गीतांजली भोसले या प्रतिभासंपन्न लेखिकेने केले असून अनेक उत्कंठावर्धक गूढ रहस्यमय घटना शांती भवन’मध्ये दडलेल्या असून अद्भुतकथा अभिनेत्री लीना भागवत यांच्या वाणीतून ऐकायला मिळणार असून सोबत कुतूहल चाळविणाऱ्या रंजक पार्श्वसंगीताची जोड असल्याने ‘शांती भवन’ स्टोरीटेल ओरीजनलच्या रसिकांसाठी पर्वणी असणार आहे.

मराठी चित्रपट, टेलिव्हिजन व नाट्यसृष्टीतील चोखंदळ अभिनेत्री असा लौकिक असलेल्या अभिनेत्री लीना भागवत यांनी भरमसाठ भूमिका करण्यापेक्षा दर्जेदार कलाकृतींना पसंती देत रसिकांचे टेलिव्हिजन, चित्रपट, नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अमोल पालेकरांच्या 'कैरी', सचिन कुंडलकर यांच्या 'गंध', राजेश देशपांडे यांच्या 'धुडगूस' तसेच 'इश्कवाला लव्ह', 'वाघिऱ्या', 'पाच नार एक बेजार', 'फक्त तुझ्याचसाठी', 'आजचा दिवस माझा', 'डोह', 'मन पाखरू पाखरू', 'हाथी का अंडा', 'जोडीदार', 'झाले मोकळे आकाश' इत्यादी चित्रपटात काम केले आहे.

'गोष्ट तशी गंमतीची', 'अधांतर', 'चल तुझी सीट पक्की'.. अशी रंगभूमीवरील अनेक दर्जेदार नाटके व 'अग्निहोत्र', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'ठिपक्यांची रांगोळी', 'होणार सून मी या घरची' तसेच 'फू बाई फू' हा स्टॅण्डअप कॉमेडी शो आणि लॉकडाऊनमध्ये 'आठशे खिडक्या नऊशे दारं' मधील भूमिकांतून त्यांनी रसिकांच्या मनात अतूट नाते विणत ‘स्टोरिटेल मराठी’साठी ‘नैवेद्य’, ‘नॉट माईन’, ‘माया महा ठगनी’, ‘बाईच्या आनंदाची व्याख्या’, अश्या दर्जेदार ‘ऑडीओ बुक्स’द्वारे आपल्या आवाजातून प्रेक्षकांना भुरळ घालीत रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.