'धग', 'भोंगा' अशा गाजलेल्या सिनेमांचं नाव घेतलं तर डोळ्यासमोर येणारं पहिलं नाव म्हणजे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम कथानक असलेले सिनेमा सिनेसृष्टीला दिले. त्यामुळे त्यांच्या सिनेमाची प्रेक्षक कायमच आतुरतेने वाटत पाहत असतात. यामध्येच त्यांचा 'आतुर' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं. या सिनेमात अभिनेत्री प्रिती मल्लापूरकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अलिकडेच प्रितीने या सिनेमाविषयीचे काही किस्से शेअर केले. यावेळी बोलत असताना सेटवर दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी कलाकारांची कशाप्रकारे फिरकी घेतली हे सांगितलं.
"सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अचानकपणे प्रणव रावराणे याच्या डोक्यात कल्पना आली आणि कच्चा बादामवर रील करुयात असं तो म्हणाला. त्यावेळी सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं चांगलंच ट्रेंड कर होतं. विशेष म्हणजे चिन्मय आणि तो चक्क रील करायला लागले. त्यांचा उत्साह पाहून मी सुद्धा त्यांच्यात सहभागी झाले. आम्ही तिघे पण रील करण्यात दंग झालो होतो. तितक्यात तेथे शिवाजी लोटन पाटील सर आले आणि त्यांनी आम्हाला खडसावलं", असं प्रीती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तुम्हाला रील करायचे पैसे दिले नाहीयेत, अभिनय करायचे दिले आहेत., असं ते म्हणाले. पण, ते खरोखर आमच्यावर चिडले नव्हते. त्यांनी आमची मस्करी केली होती."
दरम्यान, हा मजेदार किस्सा प्रितीने सांगितल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवरही याविषयीची पोस्ट शेअर केली होती. "मी चिन्मय ला सांगत होते.. सेट वर रील शूट करायला नको director ओरडतात... आणि तसच झालं...", असं कॅप्शन देत तिने कच्चा बादामवर रिल करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.