Join us

अभिनेत्री रिंकु राजगुरू म्हणते, ‘चाकोरीबाहेरच्या भूमिका करण्यात मजा!’

By अबोली कुलकर्णी | Published: December 18, 2020 12:31 PM

रिंकू राजगुरू ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर आता अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज’ या चित्रपटात दिसणार आहे. या लघुपटांमध्ये लॉकडाऊनमधील नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे.

 ‘सैराट’ सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. रिंकू राजगुरू ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर आता अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज’ या चित्रपटात दिसणार आहे. या लघुपटांमध्ये लॉकडाऊनमधील नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे. पाच हिंदी लघुपट असलेला ‘अनपॉज’चा ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट आज १८ डिसेंबरला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. याबाबत रिंकु राजगुरूसोबत मारलेल्या या गप्पा...                       

 *  तुझ्या ‘अनपॉज’ या चित्रपटाविषयी काय सांगशील? तुझी भूमिका, कथानक नेमकं कसं आहे?- या चित्रपटात लॉकडाऊनमध्ये घडलेल्या पाच गोष्टी आहेत. मी जिची व्यक्तीरेखा केली आहे ती चित्रपटसृष्टीमध्ये काम करू इच्छिते. घरच्यांशी भांडून तिला या क्षेत्रात नाव कमवायचं आहे. अचानक लॉकडाऊन आल्याने मग मुंबईत एकटी कशी राहणार? तिच्याकडे तेवढे पैसेही नसतात. मात्र, आता कसं सगळं सांभाळायचं या विचारात असतानाच तिची एका जवळच राहणाऱ्या  वयस्कर महिलेशी ओळख होते. तिच्याशी मैत्री होते. त्या दोघींचं कसं जमतं हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

 * ‘अनपॉज’ची इतकी तगडी टीम, दमदार कथानक असताना काय नवीन तुला शिकायला मिळालं?- खुप गोष्टी मी शिकले. माझा आत्तापर्यंतचा प्रवास बघता माझा वेगवेगळया कलाकारांसोबत संपर्क आला. त्यांच्याकडून मी माझ्यात बदल घडवून आणणाऱ्या  अनेक गोष्टी शिकले. अनपॉजच्या टीमसोबत घालवलेला वेळ तर कायम लक्षात राहण्यासारखा आहे. खुप मोठी माणसं आणि त्यांची शिकवण मला माणूस म्हणून मोठं करणारी आहे. 

 *  लॉकडाऊन, कोरोना यांच्यामुळे सेटवर वातावरण कसं होतं?- खुप मज्जा आली. खरंतर खुप भारी वाटत होतं. सेटवर लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सगळेच जण खुप काळजी घ्यायचे. सेट सॅनिटाइज करणं, सगळयांची तपासणी, मास्क वापरायचे या सगळयांमध्ये एक वेगळा अनुभव मिळाला. सेटवर खुप कमी माणसं असायची. पण, तरीही प्रत्येक जण आपल्या कामाबाबतीत तेवढाच लक्षपूर्वक काम करत असत. 

 *  तू भूमिकांच्या बाबतीत खुप चोखंदळ आहेस. प्रोजेक्ट स्विकारण्यापूर्वी तू कोणत्या बाबींचा विचार करतेस?- अर्थात स्क्रिप्ट. तसेच एकदा साकारलेले पात्र मी पुन्हा साकारत नाही. जसे की, प्रेक्षकांना आर्ची आवडली होती. पण, मला आर्चीसारखं पात्र पुन्हा करायचं नव्हतं. वेगवेगळया भूमिका करायला मला खूप आवडतात. भूमिकांच्याबाबतीत प्रयोग करत राहणं मला आवडतं.

 *  तू आता बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहेस. काय सांगशील त्याविषयी? किती उत्सुक आहेस?- मी प्रचंड उत्सुक आहे. वेगवेगळया भूमिका करता येतील. माझ्यातील क्षमता आजमावून बघता येतील. प्रेक्षकांनाही मला नव्या रूपात बघायला आवडेल. बॉलिवूडचं हे नवं जग मला बघायचंय.

 * सोशल मीडियावर तू बरीच अ‍ॅक्टिव्ह असतेस. कसं वाटतं फॉलोअर्सचं एवढं प्रेम मिळतं तेव्हा...- खरंतर खुप भारी वाटतं. मला हवे ते फोटो मी पोस्ट करते. त्यानंतर मी लाईक्स, कमेंट्स काहीच पाहत नाही. माझे चाहते माझ्यावर एवढं भरभरून प्रेम करतात, हे बघून खुप छान वाटतं. 

 *  ग्लॅमरच्या दुनियेत आल्यानंतर तू कोणत्या गोष्टी मिस करतेस?- बाहेर फिरायला जाणं, मैत्रीणींसोबत गप्पा मारणं, मनाला वाटेल ते खाणं या सगळयाच गोष्टींना थोडे बंधनं येतात. पण, काही गोष्टी करणं मी मिस करत असेल तर इतर काही गोष्टी मी शिकतही आहे. त्यामुळे असं फार वाईट या गोष्टी करता येत नाहीत म्हणून वाटत नाही.

 * तुझ्या आत्तापर्यंतच्या करिअरकडे कसं बघतेस? तुझा यशाचा फॉर्म्युला काय आहे?- माझे यश हे माझी मेहनत आणि माझे कुटुंब यांच्यावर अवलंबून आहे. माझे कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे मी एवढे चित्रपट करू शकते. तेच माझे मोठे आधारस्तंभ आहेत. 

 * पुढच्या पाच वर्षांत तुला स्वत:ला कुठे बघायचेय?- मी जिथे आहे, तिथेच राहायला आवडेल. माझ्या घरच्यांसोबत, रसिकांच्या हृदयात राहायला आवडेल. अजूनही चांगले चित्रपट करायचे आहेत. खुप प्रगती करायची आहे, असे वाटते.

टॅग्स :रिंकू राजगुरूमराठीसिनेमा