कोरोनामुळे अनेक कलाकरांच्या लग्नाच्या तारखाही पुढे ढकलाव्या लागत होत्या. अखेर अनेकांनी कोरोना नियमांनुसारच लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. परिस्थिती चांगली होण्याची वाट रुचिता जाधवनेही पाहिली होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहता अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला होता.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकार कोरोना काळात गरजुंच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. दिवसरात्र एक करुन मदत करत आहेत. अशात अभिनेत्री रुचिता जाधव नेहमीच समाजकार्यासाठी पुढे असते. तिच्या लग्नातही याच गोष्टीची प्रचिती आली होती. ३ मे रोजी पाचगणी येथील एका फॉर्महाऊसमध्ये रुचिताचा उद्योगपती आनंद माने यांच्यासह अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला होता. लग्नात कोरोनाचे नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत काळजी घेण्यात आली होती.
लग्नाचा जास्त गाजावाजा न करता हे लग्न पार पडले. या लग्नाचे खास वैशिष्ट म्हणजे. ठरवल्याप्रमाणे आधी संगीत कार्यक्रमही होणार होता. पण या कपलने त्यांचा संगीत कार्यक्रम रद्द करत पाचगणीतल्या जवळच्या गावांतील लोकांना दाळ आणि तांदळाची १५०० पाकिटांचे वाटप करत समाजिक बांधिलकी जपली.
त्यांचे हे समाजकार्य लग्नापुरतेच मर्यादित न ठेवता पुढेही त्यांनी सुरुच ठेवले. रुचिताचे पती आनंद माने आणि सासरे राजेंद्र मानेदेखील कोरोना काळात मदतकार्य करत आहेत. विशेष म्हणजे माने फाऊंडेशनची त्यांनी स्थापना केली आहे. या फॉऊंडेशन अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. तसेच ब्लड डोनेशन सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम माने फाउंडेशन अंतर्गत करण्यात येत आहे. लग्नानंतर कपल त्यांच्या कुटुंबासह इतरांचीही तितकीच काळजी घेत आहेत. त्यामुळे रुचिताच्या सासरच्या मंडळींचेही करावे तितके कौतुक कमीच आहे.