कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर संजय रॉयला अटक केली आहे. या घटनेचा देशभरात निषेध नोंदवला जात आहे. याच घटनेवर मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींकडूनही संताप व्यक्त केला जातोय. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकरने या प्रकरणी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
सई ताम्हणकरची संतप्त पोस्ट
सईने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन लिहिलंय की, "आपण स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत पण यंदाचा हा दिवस अजिबात आनंदी नाहीय. स्वातंत्र्य नाजूक आहे. या स्वातंत्र्याला विश्वास आवश्यक आहे. आपण स्वातंत्र्य गृहीत धरू नये. मी आजच्या दिवशी नेहमीसारखी आनंद नाही. आम्ही काहीतरी लिहू, पोस्ट शेअर करू, राग प्रदर्शित करू, पण हे करुन खरंच काही बदलणार आहे का? आज आपण देशभक्तीची गाणी वाजवणार आणि पुढे आपलं आयुष्य जगणार. पुन्हा काहीतरी घडेल त्यावर पुन्हा आपण काहीतरी लिहू. आयुष्य असंच चालू राहील. या स्वातंत्र्यदिनी नवीन नियम बनवा ना. बलात्काराची शिक्षा फाशी! महिलांना त्यांच्या 'स्त्री'पणापासून स्वतंत्र करा."
कोलकाता बलात्कार प्रकरण
कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात झालेल्या तोडफोडीप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या रुग्णालयाच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनानं बुधवारी मध्यरात्री भीषण वळण घेतलं. आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं रुग्णालय आणि परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.