सध्या बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2' हा सिनेमा चांगलाच हिट ठरतोय. त्यामुळे या सिनेमाविषयी आणि त्यातील अभिनेत्रींविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. यामध्येच या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने तिला हिंदी मालिकाविश्वात आलेल्या अनुभवाविषयी भाष्य केलं. एका हिंदी मालिकेतून तिला अवघ्या २ ते ३ दिवसात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. नुकतीच तिने सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने घडलेला हा प्रसंग सांगितला.
देवयानी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर शिवानीने अल्पावधीत कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तर बिग बॉस मराठीमधून तिने तिच्यातली खिलाडू वृत्तीही दाखवली. त्यातच अलिकडेच ती 'झिम्मा 2' या सिनेमात झळकली आहे. त्यामुळे अशा कितीतरी कारणांमुळे ती चर्चेत येत आहे. मात्र, मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच शिवानीला एका हिंदी मालिकेतून काढता पाय घ्यावा लागला.
"मी आठवीत असताना माझं नाटक बघून माझी एका मालिकेसाठी निवड झाली होती. झी टीव्हीवरची ती मालिका होती. अगले जन्म मोहे बिटियाँ किजो, या मालिकेसाठी माझी निवड झाली होती. पण, माझ्या आईचा एक नियम होता. १० दिवस शुटिंग असेल तरच करायचं नाही तर नाही करायचं मग. यात कोणतीही तडजोड नव्हती. त्यावेळेस मी अभिनय क्षेत्रात फारच नवीन होते. त्यामुळे घरीही असं कोणी नव्हतं जे मला सांगू शकेल की टीव्हीवर कसं काम करायचं, कॅमेरा कसा फेस करायचा वैगेर", असं शिवानी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यानंतर माझ्याकडून चांगलं काम झालं नाही. त्यांनी मला २ ते ३ दिवसात त्या मालिकेतून काढून टाकलं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं. पण, मी हार मानली नाही. आपण ऑडिशन देत राहू असं ठरवलं. त्यानंतर याच काळात मला मालिकेच्या निर्मात्यांचा फोन आला आणि काम केलेल्या दिवसांचा चेक घेऊन जा असं सांगितलं. पण, मला तो चेक घ्यायला जातांनाही कसं तरी वाटत होतं. कारण, मला मालिकेतून काढून टाकलं होतं. मग आपण कशाला पैसे घ्यायला जायचं. त्यामुळे मी १-२ महिने गेलेच नाही. मग त्यांनी पुन्हा मला फोन केला." त्यावेळी मग मला जावं लागलं.
दरम्यान, शिवानीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. देवयानी, फुलवा, अनामिका,तू जिवाला गुंतवावे, नव्या अशा कितीतरी हिंदी-मराठी मालिका तिने केल्या आहेत. सोबतच सातारचा सलमान, वाळवी, ट्रिपल सीट आणि आता झिम्मा 2 अशा काही सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.