आपल्या स्व-कर्तृत्वावर स्वत:ला सिद्ध करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर. मराठी सिनेमातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी श्रिया हिंदी सिनेमा, वेबसीरिज, जाहिराती अशा अनेक माध्यमांमध्ये झळकली आहे. विशेष म्हणजे मराठीपेक्षा तिने हिंदी मनोरंजन विश्वात जास्त काम केलं आहे. त्यामुळे आई-वडील प्रसिद्ध मराठी कलाकार असतानाही तिने मराठी सिनेसृष्टीकडे पाठ का फिरवली? असा प्रश्न तिला विचारला जातो. यावर आता तिने स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे.
अलिकडेच श्रियाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कारकिर्दीसह घराणेशाही यांसारख्या अनेक विषयांवर भाष्य केलं. एकुलती एक या सिनेमात श्रियाने सचिन पिळगांवकर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. परंतु, या सिनेमानंतर ती मराठीत कुठेच दिसली नाही.त्यामुळे तिला मराठी कलाविश्वात काम करायचं नाहीये, असं अनेकांना वाटतं. परंतु, श्रियाने मराठीमध्ये काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
"मला मराठी सिनेमांमध्ये काम करायचं नाहीये असा लोकांचा गैरसमज आहे. एकुलती एक हा चित्रपट स्टारकिडला लॉन्च करणाऱ्या पठडीतला नव्हता. या सिनेमानंतर मी लगेच फॅन या सिनेमात झळकले. त्यामुळे मला सारख्याच हिंदी टच असलेल्या मराठी सिनेमांच्या ऑफर्स यायला लागल्या. त्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला. फॅन सिनेमानंतर मला २ सिनेमाच्या ऑफर्स मिळाल्या. पण, त्यापैकी एका सिनेमाचं काहीच झालं नाही. आणि दुसऱ्या सिनेमाचे तर दिग्दर्शक बदलले. त्यामुळे मी अजूनपर्यंत मराठी सिनेमात दिसले नाही", असं श्रिया म्हणाली. या मुलाखतीमध्ये तिने घऱाणेशाहीवरही भाष्य केलं.
मी 'फ्रीडम टू लव्ह' या नाटकात काम करत होते. नाटकाची तालीम करत असताना आई-पप्पांनी पाहिलं. पण, मला अभिनय क्षेत्रात करिअर वगैरे करायचंय अशी मी कोणतीच घोषणा केली नव्हती. मी सहज म्हणून नाटकात काम करत होते. ते नाटक पाहिल्यानंतर पप्पांनी मला त्यांच्या सिनेमाची ऑफर दिली.
'मला तुझं काम आवडलंय. मी सध्या वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या कथेवर काम करतोय. त्यात तू काम करावंस अशी माझी इच्छा आहे. तुला संहिता आवडली तर आपण एकत्र काम करू,' असे ते म्हणाले. "पण, जर मी तो सिनेमा केला तर लोक माझ्याविषयी चर्चा करतील हे नक्की होतं. मात्र, मी काहीही केलं तरी लोक बोलणारच होते. त्यामुळे पप्पांनी माझी समजूत काढली. मी पहिल्या प्रोजेक्टपासून ऑडिशन दिल्या आहेत. बॉलिवूडमध्ये 'मेकिंग ऑफ स्टार'चा वेगळा व्यवसाय चालतो. यात तुमचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तुम्हाला स्टार केलं जातं. पण, मी माझा प्रवास टप्प्याटप्प्यानेच केला आहे. मी आई-वडिलांच्या ओळखीचा फायदा घेतला नाही. किंवा, घराणेशाहीचं कार्ड वापरलं नाही.