लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान सोमवारी 12 मे 2024 रोजी सुरु झालं आणि राज्यातील या निमित्तानं सज्ज असणाऱ्या मतदान केंद्रांवर कमालीची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. काही मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली. सर्व सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील मतदानाचा हक्क बजावला.
सोनाली कुलकर्णी हिनं पुण्यातील मतदान केंद्रात मतदान केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान केंद्रावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 'कोणत्या अपेक्षेनं मतदान केलं आणि काय आवाहन कराल', या प्रश्नाला उत्तर देताना सोनाली म्हणाली, 'अपेक्षा घेऊनच मतदानाला आपण सगळे मतदानाला बाहेर पडतो. एक कुठेतरी आशेचं चिन्ह आपल्या सगळ्यांसमोर आहे. बाहेर पडलेल्या सगळ्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. आजचा दिवस आहे, जेव्हा आपल्याला महत्त्व असतं'.
पुढे ती म्हणाली, 'आजचा दिवस जर आपण वाया घालवला. तर आपल्याला पुढची पाच वर्ष बोलण्याचा हक्क नाही. किमान ज्या हक्काने आपण घरात बसून आरडाओरडा करतो. राजकीय परिस्थिती पाहून आपण राजकीय चर्चा करतो, वाद घालतो, भांडण करतो. जोपर्यंत आपण मतदानाचा हक्क बजावत नाही. तोपर्यंत या गोष्टींचा हक्क आपल्याला नाही. त्यामुळे मी तरी नेहमीप्रमाणे मतदानासाठी बाहेर पडली आहे आणि आशा करुयात की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण व्हाव्यात'. यासोबतच सोनालीनं सोशल मीडियावरही मतदानाचा फोटो शेअर करत मतदान करण्याच आवाहन केलं.