स्पृहा जोशीची ओळख संवेदनशील अभिनेत्रीसोबतच संवेदनशील कवयित्री अशीही आहे. स्पृहा जोशीला सामाजिक घडामोडी आणि विषयांसदर्भात असलेली संवेदनशीलताही वेळोवेळी दिसून आलीय. स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले.
1 मे रोजी स्पृहा जोशीने आपल्या आई आणि काकूसह सिन्नर तालुक्यातल्या धोंडबार गावात पाणी फाउंडेशनच्या श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
स्पृहा जोशी म्हणते, “मी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर गावात मी श्रमदानासाठी गेले होते. आणि माझ्या श्रमदानातल्या त्या चांगल्या अनुभवानंतर माझ्या आई आणि काकू दोघींनीही यंदा माझ्यासोबत धमदानात सहभागी व्हायचं ठरवलं. दुष्काळाशी दोन हात करण्याच्या पाणी फाउंडेशनच्या मोहिमेत मला सहभागी होता येतंय, याचं मला समाधान वाटतंय. महाराष्ट्ला सुजलाम सुफलाम करण्यात आपलाही खारीचा वाटा असल्याचा आनंद आगळाच आहे.”
स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. तिने दे धमाल या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.