हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना श्वसनासंबंधित आजार होता. शेवटच्या क्षणी त्यांना दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुलोचना दीदींच्या निधनाची बातमी कळताच अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सुलोचना दीदी या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या हे खूप कमी जणांना माहित असेल. दीदींच्या आठवणीत भावूक होऊन उषा नाडकर्णी म्हणाल्या, "दीदी प्रत्येक भूमिका जगल्या, बाई जितक्या गोड दिसायच्या तितकंच त्यांचं बोलणंही गोड होतं. बरेच दिवस झाले आम्ही एकमेकींना भेटलो नव्हतो. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्या नाहीत यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याची बातमी खूप धक्का देणारी आहे.गोड बाई गेल्या. चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माझ्याकडून त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली."
चित्रपटसृष्टीची आई गेली
सुलोचना दीदींनी २५० हून जास्त हिंदी आणि सुमारे ५० मराठी सिनेमात काम केलं. त्यांनी सुनील दत्त, देवआनंद, अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका त्यांनी पडद्यावर गाजवली आहे. वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तर १४ व्या वर्षीच त्यांचं लग्न आबासाहेब चव्हाण यांच्याशी झालं. त्यांना कांचन घाणेकर ही एकुलती एक मुलगी आहे. कांचन यांनी काशिनाथ घाणेकर यांच्याशी लग्न केलं होतं.