करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी आणि सरकारनंही दुर्लक्ष केलं. काही महिन्यांपूर्वीच सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे यांची बिकट अवस्था रिअल लाइफमध्ये हलाखीचं जीणं जगत असल्याचे समोर आले होते यांत आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
'प्रेम करूया खुल्लम खुल्ला' सिनेमा तुम्हाला आठवत असेल यांत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रेखा राव, रमेश भाटकर, किशोरी शहाणे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरात राहणारी अंबु हे पात्र साकारले होते विद्या पटवर्धन यांनी. त्यांच्या केसांच्या वेणीची हटके हेअरस्टाईल त्यावेळी तितकीच भाव खाऊन गेली होती.
केवळ अभिनेत्रीच नाही तर त्या चित्रकलेच्या बालमोहन शाळेच्या शिक्षिका होत्या. त्यांनी अनेक कलाकारांचीही करिअर घडवले आहेत. विद्या यांनी मराठी चित्रपसृष्टीला मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्या एका गंभीर आजाराला तोंड देताना दिसत आहेत. या आजारामुळे त्यांना चालणे देखील कठीण झाले आहे. दादर तेथे त्या आपल्या छोट्याशा घरी राहत असून आर्थिक खर्च सोसावा लागत आहे. बालमोहन शाळेकडूनही त्यांना मदत देण्यात आली असली तरी ती मदत पुरेशी नाही. अनेक दिग्गज कलाकारांनी मदतीचे आश्वासन दिले होते. यात काही कलाकारांनी पुढाकार घेऊन थोडी फार मदत देखील केली. परंतु ती मदत देखील तुटपुंजी आहे. त्यामुळे सध्या कुणी मदत देता का मदत अशीच म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.