बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितने ‘पंचक’ या तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. या चित्रपटाची ती निर्मिती करणार असून या चित्रपटात अंधश्रद्धेवर कॉमिक अंदाजाने भाष्य केले जाणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
माधुरीने १५ ऑगस्ट या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळाला होता. आता या चित्रपटानंतर पंचक हा तिचा दुसरा चित्रपट असून तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा कोकणातील एका गावाभोवती फिरणारी असून या चित्रपटात अंधश्रद्धा, मृत्यूविषयी असणारी भीती याविषयी दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाविषयी माधुरी सांगते, ‘या चित्रपटाची कथा एका कुटुंबावर आधारित असून अंधश्रद्धेमुळे कशा गमतीजमती घडतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली चित्रपट असून प्रेक्षकांना संपूर्ण कुटुंबासोबत पाहाता येणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम नेने सांगतात, पंचकची कथा अतिशय साधी असून ती लोकांना भावेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ यांची निवड करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.
पंचक या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जठार करणार असून अदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान यांच्या या चित्रपटात मुख्य भुमिका आहेत. तसेच आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतिश ओळेकर, दीप्ती देवी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १० ऑक्टोबर 2019 ला सुरुवात होणार आहे.