आदिनाथ कोठारेचा आज म्हणजेच १३ मे ला वाढदिवस असून त्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीतील आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. त्याने एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आदिनाथने माझा छकुला या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात एका बालकलाकाराच्या भूमिकेत तो झळकला होता. त्यानंतर त्याने त्याचे वडील महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. झपाटलेला २, सतरंगी रे यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. आता त्याचा पाणी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्याने केले आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला सध्या खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आदिनाथ कोठारेचे लग्न अभिनेत्री उर्मिला कानेटकर सोबत झाले असून त्यांना जीजा ही मुलगी आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची ही जोडी खूपच आवडते.
तुम्हाला माहीत आहे का, उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांना तो या चित्रपटासाठी असिस्ट करत होता.
या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली होती. तेव्हा आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले.