क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं. आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ८३ नावाचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. सध्या विश्वविजेत्या क्रिकेट टीममधील दिग्गज ८३ या चित्रपटामधील कलाकारांना क्रिकेटचे प्रशिक्षण धर्मशाला येथे देत आहेत.
रणवीर सिंगच्या या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे झळकणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या धर्मशाला येथे क्रिकेटचे धडे गिरवत असून आदिनाथ कोठारे देखील धर्मशालामध्येच आहे. तिथे दिग्गज क्रिकेटर्सकडून मार्गदर्शन घेण्याचा त्याचा अनुभव खूपच छान असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आदिनाथने कपिल देव यांच्यासोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या पोस्टसोबत त्याने लिहिले आहे की, साक्षात देवासोबत... या महान व्यक्तीला भेटणे आणि त्यांच्यासोबत चर्चा करणे यासारखा कोणता सन्मान असू शकतो का? मी स्वतःला भाग्यवान समजतो.
आदिनाथ हा ८३ या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे त्यानेच सांगितले होते. या चित्रपटाच्या भूमिकेविषयी बोलताना त्याने म्हटले होते की, या चित्रपटात मी दिलीप वेंसरकर यांची भूमिका साकारणार आहे. मला क्रिकेट हा खेळ लहानपणापासूनच आवडतो. हा खेळ खेळण्यात आणि तो पाहाण्यातच माझे बालपण गेले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रचंड खूश आहे. या चित्रपटासाठी आम्ही सध्या प्रशिक्षण घेत असून बलविंदर सिंग संधू, यशपाल शर्मा, कपिल यांचे मार्गदर्शन या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मिळत आहे.