भरत जाधव, प्रिया बेर्डे, विजय चव्हाण यांसारख्या दिग्गज कलाकांराची मुख्य भूमिका असलेला सिनेमा म्हणजे 'जत्रा'. दोन गावांमधील वादांवर आधारित असलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. इतकंच नाही तर या सिनेमाचा सिक्वल यावा अशीही मागणी केली जात आहे. अलिकडेच या सिनेमाचे केदार शिंदे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सिनेमाशी निगडीत अनेक किस्से शेअर केले. यावेळी बोलत असताना त्यांनी कोंबडी पळाली या गाण्यासाठी क्रांती रेडकर पहिली पसंती नव्हती असं सांगितलं.
'कोंबडी पळाली' हे गाणं मराठी कलाविश्वातील माइल स्टोन ठरलेलं गाणं आहे. या गाण्यामुळे क्रांती रेडकर रातोरात सुपरस्टार झाली. परंतु, या गाण्यासाठी ती दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती. या गाण्यासाठी प्रथम वादळवाट फेम अभिनेत्री अदिती सारंगभर हिला विचारणा करण्यात आली होती. परंतु, या गाण्यासाठी तिने नकार दिला.
या कारणामुळे आदितीने दिला नकार
या सिनेमाममध्ये आदितीने बकुळाबाईची भूमिका साकारावी अशी केदार शिंदेची इच्छा होती. परंतु, या सिनेमासाठी तिच्याकडे वेळ नव्हता. ती वादळवाट मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तसंच तिच्याकडे इतरही काही प्रोजेक्ट्स होते. त्यामुळे वेळेअभावी तिने या सिनेमाला नकार दिला. त्यानंतर केदार शिंदेने बकुळाबाईच्या भूमिकेसाठी प्रिया बेर्डेला विचारलं. त्यांनी लगेच या सिनेमासाठी होकार दिला. त्यानंतर कोंबडी पळालीसाठीही अदितीला विचारलं होतं. परंतु, तिला शक्य होत नसल्यामुळे हे गाणं क्रांतीच्या पदरात पडलं. क्रांतीला या गाण्याची ऑफर मिळाल्यानंतर तिने लगेच होकार दिला आणि ती साताऱ्याला रवाना झाली.
दरम्यान, भारती आचरेकर आणि क्रांती रेडकर एकाच नाटकात काम करत होत्या. त्यामुळे केदारला माझं नाव भारती मावशीने सुचवलं असंही क्रांतीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.