अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav)ने आजवर अनेक मराठी चित्रपटातून काम केले आहे. तसेच त्याने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. सिद्धार्थ जाधवने अभिनयाव्यतिरिक्त आपल्या अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना आपलेसं केले आहे. तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊदे ना धिंगाणा (Aata Hou De Dhingana) या शोमध्ये दिसत आहे. या शोचे तो सूत्र संचालन करत आहे. या शोमध्ये नुकतेच त्याचे आईवडील देखील आले होते. यावेळेस तो खूपच भावुक झाला होता.
सिद्धार्थ जाधव म्हणाला की, माझे वडील एका चित्रपटगृहाच्या बाहेर पेपर अंथरून झोपायचे. आज मी त्या जागेसमोरच आलिशान टॉवरमध्ये घर घेतले आहे. हे सांगताच त्याच्या वडिलांनाही आनंदाश्रू आले. त्याच्या वडिलांनी देखील आपल्या मुलाचे कौतुक करून सांगितले की, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मी ज्या ठिकाणी झोपायचो त्याच्या समोरच त्याने घर घेतले आहे. यावेळेस या कार्यक्रमाला प्रिया मराठेसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एकूणच सिद्धार्थ यावेळेस खूपच भावुक झाल्याचा दिसला.
मराठी इंडस्ट्रीतील विनोदी अभिनेता अशी ओळख सिद्धार्थ जाधव याने कमावली. त्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अशाच भूमिका स्विकारल्या होत्या. मात्र त्याने त्यानंतर वेगळ्या भूमिकाही केल्या. यात 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'रझाकार', 'ड्रीम मॉल', 'बकुळा नामदेव घोटाळे', फास्टर फेणे या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. २०१७ मध्ये त्याने सिंबा हिंदी चित्रपटात काम केले. राधे, सूर्यवंशी या हिंदी सिनेमातही तो झळकला. याशिवाय सिद्धार्थ 'गांधी टॉक्स' नावाच्या मुकपटाचा महत्त्वाचा भाग आहे. या सिनेमात त्याच्यासोबत विजय सेतूपती, अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.