डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच शिवाजी साटम आणि अलका कुबल ही जोडी या चित्रपटात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारात आहेत. तब्बल २३ वर्षांनी ते या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. ‘सीआयडी’फेम शिवाजी साटम आणि ‘माहेरची साडी’मुळे आजही लक्षात राहिलेली अलका कुबल यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. हे दोघे तब्बल दोन दशकानंतर एकत्र येत असल्याने या चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. बहुप्रतीक्षित ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये अनेक कसदार अभिनेते आहेत. त्यामध्ये आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे, कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली असून पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर सलील कुलकर्णी यांनी स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.
अलका कुबल या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबत लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा अश्या अनेक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. स्त्रीधन आणि तुझ्यावाचून करमेना या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले आणि यशस्वी अभिनेते आहेत. १९९७ साली दूरचित्रवाणीवर आलेल्या ‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न या भूमिकेने ते घराघरात पोहचले आहेत. ‘एक होती वाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महा्राष्ट्र सरकारचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’चा प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात. वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.