बालकलाकार म्हणून अभिनेता पार्थ भालेराव(Parth Bhalerao)ने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. आतापर्यंत त्याने हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले आहे. आता तो अभिनयानंतर आता नवीन क्षेत्रात पाऊल टाकतो आहे. तो दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित 'हम दोनो और सूट' हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन पार्थ भालेराव करणार आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे.
दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो, ''मला ही कथा प्रचंड भावली. १९७०च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग १३ जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे ९ वाजता होणार आहे.''
रितिका श्रोत्री म्हणते, ''यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना १ तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहाते. आता पुढे काय होणार याची. ही कथाच अतिशय सुंदर आहे.या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.''