Join us

अभिनयानंतर आता मराठमोळा अंकुश चौधरी करतोय या क्षेत्रात दमदार पदार्पण, जाणून घ्या याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:00 IST

अभिनेता अंकुश चौधरी गेल्या २५ वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.

ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे. अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने ४० हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून त्याचा सिनेक्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य लेट्सफ्लिकला यशाच्या वाटेवर नक्कीच नेईल, याची सर्वांना खात्री वाटते.

प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया नेटवर्क चे संस्थापक राहुल नार्वेकर यांनी नुकतीच 'लेट्सफ्लिक्स मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली. या घोषणेपासून मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

या भागीदारी संदर्भात अंकुशला विचारले असता, अंकुश म्हणाला, "मला 'लेट्सफ्लिक्स मराठी' ची संकल्पना आवडली आणि जेव्हा नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर हे संस्थापक असल्याचे समजले तेव्हा अशा टॅलेंटेड लोकांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी एक नवीन अनुभव असेल म्हणून मी लगेचच यासाठी सहमती दर्शवली. मराठी मनोरंजन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि मराठी आशयासाठी असलेल्या या स्वतंत्र ओटीटी माध्यमाच्या निर्मितीमुळे मराठी कलाकारांना नामी संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर आणि नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत काम करायला ही मजा येईल, कारण दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि आम्ही तिघे मिळून जगभरातील मराठी भाषिक प्रेक्षकांना चांगला मराठी आशय (कंटेंट) देण्यासाठी प्रयत्नशील असू."

गेल्या काही वर्षांमध्ये, दर्जेदार आशय निर्माण झाल्याने मराठी मनोरंजन क्षेत्र प्रगतीपथावर पोचले आहे. अशातच 'लेट्सफ्लिक्स मराठी' च्या येण्याने नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. यात ओरिजनल मराठी चित्रपट, वेबसिरीज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरीस्, इत्यादी दाखविले जातील. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगला त्याचप्रमाणे इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :अंकुश चौधरी