श्रुती मराठेने (shruti marathe) तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अलीकडेच तिनं झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. श्रुती मराठेनंतर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती आणि दिग्दर्शनात पदार्पण करतेय.
ही अभिनेत्री आहे अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम. मधुरा आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा प्रयोग करत आहे. तो प्रयोग म्हणजे 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' हा कार्यक्रम मधुरा रंगमंचावर घेऊन येत आहे. नुकताच ह्या कार्यक्रमाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
मधुरानं या कार्यक्रमाची घोषणा एका टीजरद्वारे केली. मधुरानं 'मधुरव' हे पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णतः बंद असताना "मधुरव"चे ऑनलाइन पद्धतीने प्रयोग केले. त्या उपक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसादही मिळाला होता. मधुरा दरवर्षी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करते. यंदाच्या वर्षी 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' रंगमंचीय कार्यक्रमाची निर्मिती मधुरा करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेली दोन वर्ष मराठीत एम.ए. चा अभ्यास करत असताना मराठी भाषेविषयी मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी मला समजल्या. त्या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत असे तिला वाटले.आणि म्हणूनच मराठी साहित्यातील आजवर न ऐकलेले लिखाण, मनोरंजन, माहितीपूर्ण आणि संवाद साधता येणारा मधुरव - बोरू ते ब्लॉग' असा हा अनोखा कार्यक्रम करण्याचे मी ठरविले. ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका मी पार पाडणार असल्याचे अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी सांगितले. यावर्षाअखेरीस आता हा कार्यक्रम रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज होणार आहे.