Join us

'…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही', प्रसाद ओकची ‘त्या’ सिनेमाच्या अपयशानंतर झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 10:30 AM

Prasad Oak : अभिनयासोबतच प्रसाद ओकने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामेळे अनेकदा दोघांचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. 

अभिनयासोबतच प्रसादने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’, ‘कच्चा लिंबू’, ‘हाय काय नाय काय’ यांसारखे चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. प्रसादच्या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे सिनेमा फ्लॉप ठरला होता. ‘कच्चा लिंबू’च्या अपयशानंतर प्रसाद ओकला मोठा धक्का बसला होता. ‘छापा काटा’ या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत प्रसाद ओकने याबाबत भाष्य केले आहे.

प्रसाद ओक म्हणाला, कच्चा लिंबू चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मी आणि चिन्मय मांडलेकरने जवळपास तीन वर्ष काम केले होते. काहीतरी वेगळे देण्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला होता. पण ती दाहकता बघायची लोकांची मानसिकता नव्हती. आज जर कच्चा लिंबू आला असता, तर १०० टक्के चित्रपट चालला असता. कारण, ओटीटीमुळे लोकांना दाहक वास्तव बघायची सवय झाली आहे. कच्चा लिंबूचा काळ चुकला, असे मला वाटते.प्रसाद म्हणाला की, कच्चा लिंबू चित्रपटाच्या अपयशानंतर फार वाईट वाटले होते. निर्मात्यांनी प्रचंड पैसे लावले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. पण तेव्हा मी खूप खचलो होतो. चार ते पाच दिवस जेवलो नव्हतो. एक अन्नाचा कणही माझ्या पोटात गेला नव्हता. लोकांना हे का बघायचे नाही? असा प्रश्न मला पडला होता.

पुढे तो म्हणाला, दिव्यांग अपत्य असलेल्या पालकांसाठी बाहेरच्या देशात कोर्स असतात. आज आपल्या कार्यक्रमात असे एखादे मुल आले तर आपण त्याकडे कसं पाहतो? त्याच्या आईवडिलांना या सगळ्याचा जास्त त्रास होतो. ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला होता. पण शेवटी प्रत्येक कलाकृती नशीब घेऊन येत असते. ते चालणे न चालणे हे शेवटी प्रेक्षकांच्या हातात असते.
टॅग्स :प्रसाद ओक