Join us

'बाळाच्या जन्मानंतर मी त्याला १२ दिवसांनी पाहिलं, कारण..'; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 3:34 PM

Aarti wadgabalkar: आरतीने तिच्या प्रेग्नंसी काळातील कठीण क्षणांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

कलाविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं सामान्य लोकांना कायम अप्रूप वाटत असतं. यात खासकरुन कलाकार मंडळींच्या लक्झरी लाइफस्टाइल, त्याचा सोशल मीाडियावरचा वा समाजातील वावर पाहता यांचं लाइफ एकदम झक्कास चाललं असेल वाटतं. परंतु, या कलाकारांचं पडद्यावरचं आणि पडद्यामागचं आयुष्य दोन्ही फार भिन्न असतात. या कलाकार मंडळींना सुद्धा दु:ख, वेदना, संघर्ष यांसारख्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री आरती वडगबाळकर हिची चर्चा रंगली आहे.

अलिकडेच आरतीने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या 'तिची गोष्ट'मध्ये तिने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं. आरतीने IVF पद्धतीने तिच्या बाळाला जन्म दिला. मात्र, तिच्या डिलिव्हरीनंतर तिच्या बाळाला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे तब्बल १२ दिवसांनंतर तिने तिच्या बाळाला पाहिलं होतं. "बाळाचं प्लॅनिंग करण्यापूर्वी आम्ही नॉर्मल मेडिकल चेकअप केलं होतं.त्यात नैसर्गिकरित्या मला आई होण्यामध्ये काही अडचणी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मग आम्ही IVF चाचणी द्वारे बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. पण, आमची पहिली  चाचणी फेल गेली. हा सगळा प्रवास खूप त्रासदायक असतो. या काळात मी इंडस्ट्रीत काम करणं सुद्धा बंद केलं होतं. पण, त्यामुळेच मी कलरछाप हा ब्रँड सुरु करु शकले. त्यानंतर मी पुन्हा बाळासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. पण, माझी सगळीच प्रेग्नंसी खूप त्रासदायक होती. माझं बाळ वेळेपूर्वीच (Preterm baby) जन्माला आलं. त्यामुळे त्याचं वजन कमी होतं. तो फक्त ९०० ग्रँमचा होता. त्याला NICU मध्ये ठेवलं होतं. आपण ऐकतं की, ", असं आरती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "लवकर जन्माला आलेली मुलं मोठी होतात वगैरे. पण, त्यावेळीचा प्रत्येक क्षण, दिवस कठीण असतात. मी माझ्या बाळाला जन्माच्या १२ दिवसांनंतर पहिल्यांदा पाहिलं.कारण, त्याला लगेच NICU मध्ये नेलं. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर NICU चे डॉक्टर त्याला न्यायला तयारच होतं. बाळाचं वजन कमी असल्यामुळे त्याला NICU मध्ये नेण्यात आलं. त्याला नेण्यापूर्वी मी फक्त डॉक्टरांचं बोलणं इतकंच ऐकलं होतं की, 'आपण आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करुयात'. पण, हे त्यांचे शेवटचे शब्द ऐकले आणि मला भूल दिली होती त्यामुळे मला भूल चढली. मात्र, त्यांचं हे वाक्य ऐकल्यावर मला माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे" 

दरम्यान, आरतीचं बाळ आता दोन वर्षांचं झालं आहे. परंतु, या मुलाखतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आरतीने तिच्या खासगी आयुष्यातील इतक्या महत्वाच्या गोष्टीवर  भाष्य केलं. अलिकडेच आरती पंचक या सिनेमात झळकली होती. त्यापूर्वी तिने टाईमपास,डबल सीट, आम्ही दोघी, टाईमपास 3 यांसारख्या सिनेमात ती झळकली आहे.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीटिव्ही कलाकार