अबोली कुलकर्णी
नाटक हे असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक कलावंताच्या अभिनयाचा कस लागतो. कलावंताला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चित्रपट, मालिकांमध्ये काम केले तरी नाटकांत काम करण्याची मजा काही औरच असते, असं खरंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. अभिनेत्री किशोरी शहाणे विज आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर या दोन अभिनेत्री ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच रंगभूमीवर एकत्र येत आहेत. यानिमित्ताने किशोरी शहाणे विज यांच्याशी मारलेल्या या गप्पा..
* तुम्ही टीव्ही मालिका, चित्रपट, नाटक या प्रकारांत काम केलं आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही नाटक करायचं का ठरवलं?- खरंतर मी स्टेजपासूनच माझ्या करिअरला सुरूवात केली. ‘मोरूची मावशी’,‘भ्रमाचा भोपळा’ यासारख्या अनेक नाटकांमध्ये मी काम केले. काळाच्या ओघात मग चित्रपट, टीव्ही यांच्यामुळे नाटक मागे पडलं. मला नाटक तर करायचं होतंच पण, मी चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. मला असं वाटतं की, या निमित्ताने मी यूटर्न घेतला आहे. नाटक या प्रकारातून खूप काही शिकायला मिळतं. चित्रपटासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही. नाटकाला मात्र वेळ मिळतो. त्यामुळे छान वाटतंय की, आता पुन्हा त्याच जुन्या जगात रमणार.
* वर्षा उसगांवकर आणि तुम्ही पुन्हा एकदा एकत्र आला आहात, काय सांगाल?- आम्ही दोघी कायमच एकमेकांच्या संपर्कात आहोत. आम्ही आत्तापर्यंत ‘आत्मविश्वास’,‘सगळीकडे बोंबाबोंब’ असे अनेक चित्रपटात काम केले. त्यासोबतच आम्ही मराठी इव्हेंटस, गेटटूगेदर यांसारख्या कार्यक्रमांमध्ये भेटतोच. चित्रपटांमध्ये काम करत असताना आम्ही एक मेकींच्या स्पर्धक होतो मात्र आज आम्ही आपापल्या आयुष्यात, करिअरमध्ये सेटल आहोत. आता मात्र आमचे लक्ष केवळ आमच्या नाटकाचा प्रोजेक्ट चांगला करण्यावर लक्ष आहे. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आमची केमिस्ट्री चांगली वाटतेय, भूमिकांची जुगलबंदी होतेय. नाटकाच्या स्वरूपावरून ते ‘स्लाईस आॅफ लाईफ’ असे नाटक वाटेल.
* कॅमेºयासमोर काम करणं आणि रंगमंचावर काम करणं यात तुम्हाला कोणती बाब जास्त आव्हानात्मक वाटते?- रंगमंचावर काम करत असताना आम्ही २ तास सलग बोलत असतो. त्याअगोदर रियाझही तसाच करावा लागतो. त्यासोबतच आमच्या लूक्सवरही आम्हाला विशेष लक्ष द्यावं लागतं. बॉडी लँग्वेजवरही आम्हाला काम करावं लागतं. खरंच नाटक म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करतो.
* भूमिकेत समरस होऊन काम करण्याचा तुम्हाला कधी कंटाळा येतो का? - नाही. खरंतर मला ते प्रचंड आवडतं. तेच तर एका कलाकाराचं काम असतं. वास्तवता येण्यासाठी आम्ही ते सादर करतो. मी माझी भूमिका एन्जॉय करते. तेच तर खरं माझं पॅशन आहे.