मराठी चित्रपटसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या सासू किंवा सून सिनेइंडस्ट्रीत काम करत आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे सई रानडे. सई रानडे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तिने स्पंदन, पकडापकडी अशा काही मोजक्या मराठी चित्रपटात काम केले आहे. दहावीत शिकत असताना सईने भरतनाट्यमचे धडे गिरवले होते यात तिला साधना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कॉलेजमध्ये असताना सत्यदेव दुबे यांच्या १५ दिवसाच्या अभिनय कार्यशाळेत तिने प्रवेश घेतला होता. सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना तिला मालिकेतून अभिनयाची संधी मिळत गेली. रुंजी, वहिणीसाहेब, कुलवधू, देवयानी यासारख्या मालिकेत तिने काम केले.
फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत सईला छोटीशी भूमिका मिळाली होती. तारा फ्रॉम सातारा, उडान या हिंदी मालिकेतून तिला महत्वाच्या भूमिका मिळाल्या. कुलवधू मालिकेत काम करत असताना ती ठाण्याला राहत होती.
शेजारीच राहत असलेल्या सलील साने सोबत तिची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. सलील हा अभिनेत्री, लेखिका, मुलाखतकार मेघना मेढेकर- साने यांचा मुलगा आहे.
मेघना साने आज कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्ष म्हणून ठाण्यातील सांस्कृतिक वातावरणात मोलाची भर टाकत आहेत. ‘कोवळी उन्हे’ हा त्यांनी स्वतः लिहिलेला आणि आयोजित केलेला कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. या एकाच कार्यक्रमातून लावणी, नाट्यछटा, संवाद, नकला असे विविध साहित्यप्रकार त्या स्वतः सादर करत असत. आजवर त्यांची आठ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांचे पती हेमंत साने हे देखील संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाने युट्युब चॅनल आहे त्यात मेघना आणि हेमंत साने दोघा दाम्पत्याने मिळून विडंबनात्मक गीते सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.