अभिनयाने ९०चं दशक गाजवणारी आणि विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी सदाबहार अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ऐश्वर्या अभिनयाबरोबरच त्यांचं सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखल्या जातात. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा त्या रील व्हिडिओही शेअर करतात. त्यावरुन त्यांना ट्रोलही केलं जातं. असंच ट्रोल करणाऱ्या एका चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी चांगलीच अद्दल घडवली होती.
ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगबद्दल भाष्य करताना एक किस्सा सांगितला. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "एका माणसाने कमेंट केली होती. त्याच्या कॉमन फ्रेंडमध्ये मला माझा एक मित्र सापडला. रात्री १०-१०.३० वाजले असतील. माझा ऑलरेडी तिळपापड झालेला होता. मी त्या मित्राला फोन केला. मी त्याला विचारलं तू या माणसाला ओळखतोस का? तो मला म्हणाला की जाऊ दे गं. तो वेडा आहे. मी त्याला म्हटलं ओळखतोस का? त्याने हो म्हटल्यावर मी त्याला म्हटलं प्लीज त्याला कॉन्फरन्सवर घेशील का? मग त्याने त्या कमेंट करणाऱ्याला कॉन्फरन्सवर घेतलं".
"माझ्या मित्राने त्याला सांगितलं की तुला माहितीये का कोण बोलतंय तुझ्याशी...ऐश्वर्या नारकर. तर तो असा होता की अरे ऐश्वर्या ताई मला आवडेल बोलायला. कशा आहात तुम्ही...मी म्हटलं ऐ चूप. तुम्ही जी कमेंट केलीय त्याचा आणि आता तुम्ही बोलताय त्याचा काय संबंध आहे का? तुम्ही कमेंट का केली अशी? तर तो म्हणाला की नाही नाही...मला क्षमा करा ती चुकून झाली. मी त्यांना म्हटलं मी आता पोलीस स्टेशनला तुमची कम्प्लेंट करायला जात आहे. मला कळलं की हा तुमचा मित्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला फोन केला. तर तो मला म्हणाला की अहो नको नको आता मी इथून तुमच्या कसं पाया पडू", असा मजेशीर किस्सा ऐश्वर्या नारकर यांनी सांगितला.