सैराट झालं जी, अप्सरा आली, वाट दिसू दे, माऊली माऊली, खेळ मांडला... ही गाणी आठवली की, हमखास आठवते ते अजय-अतुल यांचे नाव. आपल्या दमदार आवाजाने मराठी सिनेसृष्टी गाजवणा-या या जोडीने हिंदीतही यशाची पताका फडकावली. आज या जोडीतील अजय गोगावले यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अजय-अतुल या जोडीबद्दलच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
21 ऑगस्ट 1976 रोजी पुण्यात अजय यांचा जन्म झाला. घरी संगीताचे कुठलेही वातावरण नसताना अगदी शून्यातून सुरूवात करणा-या अजय-अतुल या भावांनी मोठे साम्राज्य निर्माण केले. खरे तर अजय-अतुल या जोडीत अतुल हे थोरले तर अजय हे धाकटे आहेत. पण अजय-अतुल या नावात अजय हे नाव आधी येते. यामागेही एक कारण आहे. होय, अजय नावाला एक रिदम आहे. नावाचा रिदम चांगला वाटावा, म्हणून या जोडीने अजय-अतुल हे नाव ठेवले. म्हणजेच लहान भावाचे नाव आधी आणि मोठ्या भावाचे नाव नंतर लावले.
अजय-अतुल यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होई. त्यामुळे अजय-अतुल पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात लहानाचे मोठे झाले. याकाळात ग्रामीण संस्कृती, लोकसंस्कृती, बोली भाषा, या भाषेची विशिष्ट शैली हे सगळे बारकावे त्यांना शिकता आले. अजय यांना शिक्षणात अजिबात रस नव्हता. शाळेच्या दिवसांत गाणी-नृत्य बसवणे, बँड पथकात भाग घेणे यातच ते मग्न असत.
घरात कुणालाही संगीताची पार्श्वभूमी नसल्याने साहजिकच प्रोत्साहन मिळण्याची शक्यता नव्हती. परिस्थितीही बेताची होती. त्यामुळे वाद्ये विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण संगीताचे वेड स्वस्थ बसू देईना. पुण्यात आल्यावर अजय यांनी घराजवळच्या बँडवाल्याशी ओळख केली आणि त्याच्याकडून अनेक वाद्ये शिकून घेतली. वाद्ये नसल्याने एखादी चाल ऐकवताना तोंडानेच त्या वाद्याचा आवाज काढायची खास शैलीही त्यांनी आत्मसात केला.
अजय किंवा अतुल यापैकी कुणीही संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. पुस्तकातील कवितांना चाली लावत, भजन किर्तन, बँड पथकात जाऊन ते शिकायचे ते शिकले.
संगीतकार व्हायचे स्वप्न घेऊन अजय-अतुल मुंबईत आलेत. पण पैसे नव्हते. त्यामुळे अनेक रात्री या भावांनी स्टुडिओमध्येच काढल्या. अर्थात एका अल्बमने त्यांचे दिवस पालटले. या अल्बमचे नाव होते, ‘विश्वविनायक’. यातील श्री गणेशाय धीमही हे शंकर महादेवन यांनी गायलेले गाणे खूपच गाजले.
‘अगंबाई अरेच्चा’, ‘जोगवा’ या मराठी चित्रपटांनी अजय-अतुल या जोडीचे नाव झाले. पुढे ‘सैराट’ मधील गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि अजय-अतुल जोडीला लोकांनी डोक्यावर घेतले.
बॉलिवूडनेही या जोडीची दखल घेतली. लाईफ हो तो ऐसी, विरूद्ध, गायब, सिंघम, अग्निपथ, बोल बच्चन अशा हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ या सिनेमालाही याच जोडीने संगीत दिले. या जोडीने राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरले.