मराठी कलाविश्वातील ९० चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजिंक्य देव (ajinkya deo). मराठीतील हँडसम हंक म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याकाळी अनेक तरुणींमध्ये त्यांची क्रेझ होती. त्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक तरुणी त्यांच्याभोवती गराडा घालायच्या. विशेष म्हणजे त्याची लोकप्रियता वा क्रेझ कॉलेजमध्येही तितकीच होती. कॉलेजमध्ये असतानाही अनेक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या. यात अनेकींनी त्यांना प्रेमपत्रदेखील पाठवले होते. परंतु, एकदा एका मुलीने दिलेलं प्रेमपत्र त्यांनी तिच्या तोंडावर जाऊन फाडलं होतं.
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील किस्सा सांगितला. कॉलेजमध्ये असताना मी रावडी अंदाजात फिरायचोय. त्यामुळे बरेचदा प्रोफेसरही मला दबकून होते. याच काळात अनेक मुली मला लव्ह लेटर पाठवायच्या, असंही त्यांनी सांगितलं.
"कॉलेजमध्ये माझी खूप दहशत होती. मी गोड गोंडस असा कधीच वागलो नाही. आमचं कॉलेज पार्ल्यात होतं. आमचा ग्रुप कुठेही दिसला की प्रोफेसर मार्ग बदलायचे. त्याकाळात मला दररोज प्रेम पत्र यायची. ती प्रेमपत्र मी जपून ठेवली असती तर आज त्याच्यावर एक पुस्तक छापता आलं असतं", असं अजिंक्य म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "एकदा असंच एक पत्र माझ्या मित्राने मला आणून दिलं. आणि म्हणाले हे घे तुझ्यासाठी दिलंय. ते पत्र पाहिल्यावर मी प्रचंड चिडलो. त्या काळी मुलींसोबत बोलणं सुद्धा पाप केल्यासारखंच असायचं. पण, मी थेट त्या मुलीच्या वर्गात गेलो. तीन मजले चढून एकदम रावडी स्टाइलमध्ये तिच्या वर्गात एन्ट्री केली. वर्गात गेल्यावर मी तिच्यासमोर उभा राहिलो. मला पाहून ती मुलगी प्रचंड घाबरली. त्यामुळे तिच्या मैत्रिणी तिला धरत होत्या. एकदम फिल्मी सीन झाला होता. त्यावेळी मी तिचं प्रेमपत्र तिच्या तोंडावर फाडलं आणि बघून घेईन,असं म्हणालो. पण, आता मला वाटतंय की किती मूर्ख होतो मी. अक्कलच नव्हती अजिबात. आता ती मुलगी बिचारी कुठे असेल. तिला दोन मुलंही असतील.''
दरम्यान, अजिंक्य देव यांचे आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट सुपरहिट झाले. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा मालिकांकडे वळवला आहे.