Join us

सायली अन् आकाशच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा, 'पहिल्याच दिवशी सायलीने...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 08:53 IST

सायलीने केली मोठा चूक पण तरी आकाश राहिला कूल

'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) लवकरच आगामी 'घर बंदुक बिरयानी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याची अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू नसून सायली पाटील (Sayli Patil) आहे. आकाश आणि सायलीने याअगोदर 'झुंड' चित्रपटातही एकत्र काम केलं आहे. या दोघांची पहिली भेट फारच रंजक होती. या भेटीचा किस्सा सायलीने नुकताच एका मुलाखतीत सांगितला.

सायलीने आकाशची गाडी ठोकली 

आकाशसोबत भेटीचा किस्सा सांगताना सायली म्हणाली, 'आमची पहिली भेटपण फारच भन्नाट होती. मला 'झुंड'च्या चित्रिकरणावेळी गाडी  फोर व्हीलर शिकायची होती. आकाश पहिल्यांदाच गाडी घेऊन आला होता. मला माहीतच नव्हतं की ही  त्याची गाडी आहे. ब्रेकमध्ये नागराज सरांनी मला गाडी शिकवायला आकाशची गाडी दिली होती. शिकत असताना गाडी थोडीशी पुढे नेली आणि समोरच्या खांबावर ठोकली. सगळ्यांनी गर्दी केली. लोक म्हणाले लेडी ड्रायव्हर आहे. मग मला एकाने सांगितलं की ती आकाशची गाडी आहे. हे समजल्यावर मी गाडीतून उतरायलाच तयार नव्हते. नंतर थोड्या वेळाने तो आला आणि त्याने गाडीकडे पाहिलं. गाडीचा समोरचा भाग चेपला होता.'

सायली पुढे म्हणाली, 'मला वाटलं आकाश आता मला बोलणार. पण तो एकदम कूल, शांत होता. मला म्हणाला ठीक आहे. एवढं काय त्यात आता परत होणार आहे का? मग तो म्हणाला चला जेवायला जाऊया. मी बघतच राहिले म्हणलं हा वेडा आहे का असं कुणी कसं असू शकतं.'

'घर बंदुक बिरयानी'मध्ये सायली आणि आकाश मुख्य भूमिका साकारत आहेत. तर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे देखील आहेत. नागराजच्या इतर सिनेमांप्रमाणेच यादेखील सिनेमाची रसिकांना उत्सुकता आहे. 7 एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय.

टॅग्स :आकाश ठोसरसायली पाटीलनागराज मंजुळेसयाजी शिंदे