सैराटनंतर आकाशने काही सिनेमे वेबसिरीजमध्येही काम केले. त्याचदरम्यान त्याने स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतली. म्हणून एक डॅशिंग अवतारात आकाशने अभिनयाप्रमाणे त्याच्या लूकमुळेही चाहत्यांची पसंती मिळवली होती. रुपेरी पडद्याप्रमाणे डिजिटल जगाततही सध्याच त्याचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. वॉर-एपिक सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’मध्ये आकाश प्रमुख भूमिकेत आहे. यात आकाशने सैनिकाची भूमिका साकारली आहे.
या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेत डोले शोलेही बनवले. पिळदार शरीरयष्टीसह तो पुन्हा चाहत्यांसमोर आला आहे. नुकताच आकाशने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो कुस्ती खेळताना दिसतो आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडिलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत ५ वर्ष काढली.
त्याने पुढे म्हटले की, 'तालीम' जोर,बैठका, डावपेच,शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली. तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव,गप्पा-गोष्टी...अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत.लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे.आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो.या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा,पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय.