३२ वर्षांपूर्वी 1991 साली आलेल्या 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) सिनेमाने थिएटर दणाणून सोडले होते. अलका कुबल (Alka Kubal) यांची मुख्य भूमिका असलेला 'माहेरची साडी' सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता. आजही या सिनेमाची आठवण काढली जाते. तसंच सिनेमात अलका यांच्या अस्सल अभिनयाने प्रेक्षक थिएटरमध्येच रडायचे.नुकतंच अलका कुबल यांनी सिनेमाच्या रिमेकवर भाष्य केलं आहे.
अलका कुबल सध्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या निलेश साबळेंच्या कॉमेडी शोमध्ये परीक्षक आहेत. त्यांच्यासोबत अभिनेते भरत जाधवही परीक्षकाच्या भूमिकेत आहे. 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांना 'माहेरची साडी'च्या सीक्वेलबाबत विचारण्यात आले. तसंच त्यात आताच्या कोणत्या अभिनेत्रीने भूमिका साकारावी याबाबतही त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, "मला वाटतं त्या काळातला सिनेमा आता किती स्वीकारला जाईल यात शंकाच आहे. त्या वेळी ३२ वर्षांपूर्वी चालून गेला. पण आता काळ बदललाय, कथा बदलल्या आहेत. आताची जीवनशैली वेगळी आहे. त्यामुळे आता माहित नाही किती चालेल. मला तर तेव्हाही शंकाच होती पण पिक्चर चालला."
त्या पुढे म्हणाल्या, "आता रडारडीच्या अभिनेत्री खूप कमी राहिल्या आहेत. मला वाटतं आता फक्त मालिकांमध्येच त्या असतील कारण तिथे तशाच कथा असतात. पण माझ्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर या आहेत. त्यामुळे कोणीही करु शकेल ही भूमिका साकारणं एवढं काही अवघड नाहीए."
'माहेरची साडी' प्रभात टॉकिजमध्ये तब्बल 2 वर्ष चालला होता. राजस्थानी चित्रपट 'बाई चली सासरिये' सिनेमाचा तो रिमेक होता. नंतर याचा हिंदीतही रिमेक केला गेला. जुही चावला आणि ऋषि कपूर यांनी 'साजन का घर' या रिमेकमध्ये काम केलं होतं. आता 'माहेरची साडी' चा दुसरा भागही येणार असल्याची चर्चा आहे.