२०२० साली करोनाने जगभरात थैमान घातले होते. लॉकडाऊन, रुग्णालयाच्या चकरा, आजारपण अशा अनेक कारणांनी ते वर्षच वाईट गेलं. करोनाची लाट थोडी ओसरताच पुन्हा कामाला सुरुवात झाली. सर्व खबरदारी घेत जीवन पूर्वपदावर येत होतं. दरम्यान सिनेमा, मालिकांचं चित्रीकरणही सुरु झालं. यावेळी ज्येष्ठ कलावंतांना सेटवर येण्यास मनाई होती. तरी काही ज्येष्ठ कलाकार शूटिंगला जायचे. यात अनेक कलावंतांचेही प्राण गेले. त्यातल्याच एक होत्या आशालता वाबगावकर. 22 सप्टेंबर 2020 रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
मराठी सिनेमा, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आशालता वाबगावकर अतिशय प्रभावशाली अभिनेत्री होत्या. अगदी शेवटपर्यंत त्या काम करत राहिल्या. मात्र २०२० मध्ये त्यांना करोनाने ग्रासलं. साताऱ्यात 'आई माझी काळूबाई' मालिकेचे शूटिंग सुरु होते. याचदरम्यान त्यांची तब्येत खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाच. मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांनी घेतली नाही. म्हणून अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ये यांनी आशालता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते.आशालता त्यांच्या कुटुंबियांवर नाराज होत्या. तेव्हाच त्यांनी अलका कुबल आणि समीर आठल्ये यांना माझं शेवटचं सगळं तुम्हीच करायचं असं सांगितलं होतं. आशालता यांच्या निधनानंतर अलका यांनी शब्द पाळला आणि साताऱ्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीने हळहळ व्यक्त केली होती.