अलका कुबल यांनी कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी देवाकडे घातलं साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 03:01 PM2020-04-08T15:01:00+5:302020-04-08T15:05:01+5:30
या संकटातून मनुष्यजातीला बाहेर काढ... मी खणनारळाने तुझी ओटी भरेन असा नवस अलका कुबल यांनी देवीला केला आहे.
कोरोनामुळे भारतावरच नव्हे तर जगभर संकट ओढवले असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरिने प्रयत्न करत आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनी तर आता कोरोनाचे संकट टळावे यासाठी मांढरदेवच्या काळूबाईला साकडं घातलं आहे.
सध्या चैत्र नवरात्र सुरू असून या नवरात्रात सगळ्या लोकांना या संकटातून देवीने बाहेर काढावे असे साकडं अलका कुबल यांनी काळूबाईला घातले आहे. काळूबाईचे मंदिर हे अतिशय जुने असून ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. सातारा जिल्ह्यात असलेल्या मांढरदेव येथील काळूबाईचे दर्शन घेण्याासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील देखील भाविक मोठ्या संख्येने येतात. या देवीची यात्रा जानेवारी महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सुरू झाली होती. सध्या या संकटामुळे देवीचे दर्शन सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. आता आलेल्या या संकटातून सगळ्या मनुष्यजातीला वाचव काळूबाई... मी खणानारळाने तुझी ओटी भरेन असा नवसच अलका कुबल यांनी देवाला केला आहे.
अलका कुबल यांच्या इन्स्टाग्रामला त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, अलका कुबल-आठल्ये ह्यांनी सर्वांना विषाणूच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी घातलंय नवसाला पावणाऱ्या मांढरदेवीच्या आई काळुबाईकडे साकडं! तसेच त्यांची आई माझी काळुबाई ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणार असल्याचे देखील त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे.