Join us  

"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:17 PM

अमेय वाघने सांगितलं गौतमी पाटीलला सिनेमात घेण्याचं कारण, म्हणाला, "तिच्यामुळे..."

मराठमोळा अभिनेता अमेय वाघ 'लाइक आणि सबस्क्राइब' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अमेयबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत आहे. 'लाइक आणि सबस्क्राइब' या सिनेमात डान्सर गौतमी पाटील देखील झळकली आहे. गौतमीचं या सिनेमात लिंबू फिरवलं हे आयटम साँग आहे. या गाण्यात अमेय वाघही गौतमीबरोबर थिरकताना दिसत आहे. गौतमीला सिनेमात घेण्यामागचं कारण अमेयने सांगितलं आहे. 

नुकतंच 'लाइक आणि सबस्क्राइब' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला. यावेळी अमेयला सिनेमात गौतमीबरोबर डान्स करण्याबाबत विचारण्यात आलं. "सिनेमात जो प्रसंग आहे त्यासाठी गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला ऑप्शन महाराष्ट्रात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गौतमीचे खूप चाहते आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. ती जिथे शोज करते. तिथे झाडावर लोक बसलेले असतात. छपरावर बसलेले दिसतात. तिच्या शोला खूप गर्दी असते. हे सगळे लोक मराठी सिनेमा बघायला जात नाहीत. म्हणून गौतमीला आम्ही सिनेमात घेतलंय. तिला बघायला लोक गर्दी करतात. तिच्या शोला जशी गर्दी होते, तशी गर्दी मराठी सिनेमांना व्हावी. मी थिएटरच्या आसपास छप्पर, झाडांची सोय करतो. त्याची पण तिकीटं विकतो. पण, त्यासाठी का होईना सगळ्यांनी 'लाइक आणि सबस्क्राइब'सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये यायला हवं", असं अमेय म्हणाला. 

अलिकडेच 'लाइक आणि सबस्क्राइब' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा एक रहस्यमयी थ्रिलर सिनेमा आहे. १८ ऑक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपट रिलीज होणार आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :अमेय वाघगौतमी पाटीलमराठी अभिनेतासिनेमा