Join us

मराठीचा सिनेमांचा बळी का?; हिंदीवाल्यांची मुजोरी त्वरित थांबली पाहिजे; अमेय खोपकरांचा 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 5:40 PM

Amey Khopkar : रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) हे दोन हिंदी चित्रपट रिलीज झाले. या दोन बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देत असताना दुसरीकडे मराठी सिनेमांचे शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केला आहे.

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) हे दोन हिंदी चित्रपट रिलीज झाले. या दोन बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देत असताना दुसरीकडे मराठी सिनेमांचे शोज अचानक कमी झाल्याचा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी हिंदीवाल्यांची मुजोरी त्वरित थांबली पाहिजे, असा इशारादेखील दिला आहे.

अमेय खोपकर यांनी थिएटरमधील मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झाल्यामुळे बॉलिवूडकरांचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास ३, ‘दे धक्का २’ आणि ‘एकदा काय झालं’ या मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झालेले आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे हे शोज कमी करण्यात आले आहेत.

ज्याठिकाणी मराठी चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी मिळते तिथूनही हद्दपार करण्यात आले आहे. तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का? मोठा वीकेंड आहे म्हणून बॉलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटांनाही कमाई करायची आहे. हे लक्षात न घेता, जी मुजोरी हिंदीवाल्यांनी चालवली आहे ती त्वरित थांबली पाहिजे आणि मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजे,’ अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन असा मोठा वीकेंड आल्यामुळे चित्रपटांची कमाई चांगली होईल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. त्यामुळे लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी ११ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आले. मात्र यामुळे थिएटर्समधील मराठी सिनेमांचे शोज कमी केल्याची तक्रार केली जात आहे. ‘टाईमपास ३’, ‘एकदा काय झालं’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही त्यांचे शोज कमी केले आहेत. त्यामुळे खोपकरांसह अभिनेता सुमीत राघवन आणि सलिल कुलकर्णी यांनीदेखील हा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :मनसेलाल सिंग चड्ढाअक्षय कुमारआमिर खान