Join us

'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - "संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय.."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 9:30 AM

बहुचर्चित 'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाने थांबवलंय. त्यामुळे दिग्दर्शकाने खास पोस्ट लिहून सर्वांना आवाहन केलंय (amhi jarange, manoj jarange patil)

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी चळवळ उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमााची उत्सुकता शिगेला होती. 'आम्ही जरांगे'  असं या सिनेमाचं नाव असून अभिनेते मकरंद देशपांडे सिनेमात मनोज जरांगेंची भूमिका साकारत आहेत. गेल्या शुक्रवारी अर्थात १४ जूनला सिनेमा रिलीज होणार होता. पण सिनेमाला सेन्सॉर बोर्डाशी संघर्ष करावा लागल्याने प्रदर्शन थांबवण्यात आलंय. याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसलेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

'आम्ही जरांगे' चं प्रदर्शन थांबवलं. दिग्दर्शक म्हणतात...

'आम्ही जरांगे' सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसलेंनी सिनेमाच्या टीमच्या वतीने एक खास पोस्ट लिहिली आहे. ते सांगतात की, "महाराष्ट्रात आपल्याच हक्कांसाठी, मराठा समाजाच्या न्याय अधिकारांसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष करावा लागतोय. याच आंदोलनाच्या संघर्षाचा धगधगता इतिहास जगापुढे मांडण्यासाठीआज सेन्सर बोर्ड सोबत आपल्या ' आम्ही जरांगे ' या सिनेमाला ही संघर्ष करावा लागत आहे. पण एक लक्षात घ्या. संघर्ष जरी असला तरी विजय हा नेहमीसत्याचा आणि चांगल्याचा होतो."

योगेश पुढे लिहितात, " आमचा हेतू हा इतिहास आणि संघर्ष जगापुढे आणणे हा आहे. आणि तो नक्की पूर्ण होईल. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्यापाठी संपुर्ण समाज ढाल बनून उभा आहे तसाच तो या सिनेमाच्याही पाठीशी ऊभा राहील अशी खात्री आहे. लवकरच येत आहोत नव्या तारखेसह तुमच्या भेटीला!!" 'आम्ही जरांगे' सिनेमात मकरंद देशपांडे मनोज जरांगेंची प्रमुख भूमिका साकारत असून सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पूरकर या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची नवी रिलीज डेट लवकरच समोर येईल अशी चाहत्यांना आशा आहे

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलसुबोध भावे प्रसाद ओक अजय पुरकरमराठा आरक्षण