Join us

'आम्ही जरांगे'चा संघर्ष संपला! सिनेमाचा मार्ग मोकळा, अखेर 'या' दिवशी प्रदर्शित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:36 IST

सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडल्याने या सिनेमाला ब्रेक लागला होता. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी चळवळ उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा अलिकडेच सिनेमागृहात प्रदर्शित झाला. त्यापाठोपाठ 'आम्ही जरांगे'देखील प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडल्याने या सिनेमाला ब्रेक लागला होता. सिनेमाचं प्रदर्शन थांबविण्यात आलं होतं आणि रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

योगेश भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे' सिनेमा २१ जूनला प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र काही कारणांमुळे या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. आता सिनेमाच्या टीमकडून चित्रपटाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'आम्ही जरांगे' हा सिनेमा आता जुलै महिन्यात सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. ५ जुलैला म्हणजेच पुढच्या शुक्रवारी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. 

'आम्ही जरांगे' सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे मनोज जरांगेंच्या भूमिकेत दिसणार आहेत.  तर सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पूरकर या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात अजय पूरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहेत. तर प्रसाद ओक अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या भूमिकेत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठी अभिनेतामराठी चित्रपट