राजी सिनेमानंतर अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 5:32 AM
धर्मा प्रॉडक्शन्सच्या राजी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ह्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या ह्या ...
धर्मा प्रॉडक्शन्सच्या राजी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ह्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या ह्या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राजी चित्रपटातून अमृताने दाखवून दिलं, की ती दिसायला सुंदर आहेच पण एक चांगली अभिनेत्रीही आहे. राजीच्या मुनिरा भूमिकेमूळे अमृताला बॉलिवूडची कवाडं खुली झाली. राजीच्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या अनुसार, अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे. अमृताचा लवकरच डिजीटल दूनियेत डेब्यू होतो आहे. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे. सूत्रांच्या अनुसार, अमृता सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर आहे. ह्या शिखरावर गेल्यावर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमृता नुकतीच एका घरंदाज गृहिणीच्या भूमिकेत राजीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल. लवकरच सुरू होणा-या ह्या वेबसीरिजमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमृताच्या ह्या भूमिकेच्या आसपासच कथानक विणलं गेलं आहे. ह्याविषयी अमृता सांगते, “मला करीयरच्या ह्या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढिबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे. माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे.” ब्लॉकबस्टर राजी चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमृताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. ह्याविषयी ती सांगते, "मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. ह्या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळी ह्यांच्याकडून पाठ थोपटली जातेय, त्यामूळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय. “ अमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या अनुसार, अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता ह्यात दिसणार असल्याचं समजतंय.आपल्या भूमिकेविषयी अमृता म्हणते, “ ह्या भूमिकेत मी तुम्हांला ग्रे-शेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे, की राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होउ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं. ”