‘चांदण बिलोरी कळ्या’ गीताला अमृता यांचा स्वरसाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 11:46 AM
अनेक भाव–भावना गीत-संगीताच्या माध्यमांतून जास्त प्रभावीपणे व्यक्त करता येतात. असंख्य गीतांतून आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहेच. आई आणि मुलगी ...
अनेक भाव–भावना गीत-संगीताच्या माध्यमांतून जास्त प्रभावीपणे व्यक्त करता येतात. असंख्य गीतांतून आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहेच. आई आणि मुलगी यांच्या प्रेमाची वेगळी छटा दाखविणारं असेच एक हृदयस्पर्शी गीत परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. गायिका अमृता फडणवीस यांच्या आवाजात नुकतंच हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आलं. ‘चांदण बिलोरी कळ्या आकाशीच्या विझल्या’ ‘स्वप्नातल्या त्या पऱ्या पापण्यांना ओढूनिया निजल्या’अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी सुरेख संगीत साज चढविला आहे. हे गीत श्रोत्यांना वेगळीच अनुभूती देणार असेल असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अंगाईच्या धाटणीचे हे गीत गाण्यासाठी तितक्याच मधाळ स्वराची आवश्यकता होती. अमृता फडणवीस यांनी तितक्याच तरलतेने गायलेलं हे गीत रसिकांच्या मनाचा ठाव घेईल अशी आशा गीतकार अभिषेक खणकर व संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी व्यक्त केली.नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिका शीला राजेंद्र सिंह आहेत. सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.मृता फडणवीस यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे. आता त्या पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटासाठी गाणार आहेत. डाव या चित्रपटातील पाठलाग हे गाणे त्या गाणार असून त्यांनी या गाण्यासाठी नुकतेच रेकॉर्डिंग केले आहे.पाठलाग असे गाण्याचे बोल ऐकून ते नेमका कोणाचा आणि कशासाठी ‘पाठलाग’ करतायेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच? त्यांचा हा ‘पाठलाग’ डाव या आगामी मराठी सिनेमासाठी आहे.रोज रोज पाठलाग सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ती कोणाचीअसे बोल असलेल्या या गीताचे रेकोर्डिंग करण्याचा या दोघांचा अनुभव खूपच चांगला होता. नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डावची निर्मिती केली असून कनिष्क वर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. डाव या सिनेमातील ‘पाठलाग’ हे थ्रिलर साँग गायिका अमृता फडणवीस यांनी गायले असून जीत गांगुली यांनी ते संगीतबद्ध केले आहे. संगीतकार जीत गांगुली यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. रोमांचकारी भयाने खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाचे हे शीर्षक गीत मंदार चोळकरने लिहिले आहे. या गीतासाठी ‘जॅझ’ पीसचा वापर केल्याने हे गीत आशयातील गूढता आणखीन वाढवते.जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांना हे गीत एक थरारक अनुभव देईल, असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.