Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी 54 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अमृता फडणवीस यांनी खास पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अमृता फडणवीस यांनी या खास दिवसाचे औचित्य साधून लिहलं, 'देवेंद्र फडणवीस तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही समानता आणि न्यायाचे दीपस्तंभ बनून, लोकांच्या जीवनात सुधारणा करावी आणि जगाला आनंदाने उजळून टाकावे, अशा शुभेच्छा'. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत.
अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी त्या कायम पती देवेंद्र फडणवीस यांची खंबीरपणे साथ देताना दिसून येतात. कधी टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधतात. देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचा विवाह २००५ साली झाला होता. हे दोघं नेहमीच सर्वांना कपल गोल्स देताना दिसतात.
भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. मजबूत नेतृत्व, प्रशासनावरील पकड असलेले देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ मॉडेलिंगदेखील केली होती.नागपूरच्या एका दुकानासाठी त्यांनी मॉडेल म्हणून काम केलं होतं. त्यांचे मॉडेलिंगचे फोटो सोशल मीडियात चर्चेत असतात.