Join us  

'धरण उशाला, कोरड घशाला हे...", देवेंद्र फडणवीसांबद्दल काय म्हणाल्या मिसेस उपमुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 1:43 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे एक 'पॉवर कपल' म्हणून पाहिले जाते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे एक 'पॉवर कपल' म्हणून पाहिले जाते. दोघेही कायम चर्चेत असतात. भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस हे सध्या विधानसभा निवडणुकांमुळे व्यस्त आहेत. राज्याच्या राजकारणात संपुर्ण लक्ष असल्याने देवेंद्र फडणवीसांचा वेळ मिळतो का, यावर अमृता फडणवीस यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं.

अमृता फडणवीस या नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या सन मराठीवरील "होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा' यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सोनालीशी बोलताना अमृता म्हणाल्या, "धरण उशाला, कोरड घशाला असं म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी माझ्यापुढे असे झळकतात. येतात… आणि जातात…. म्हणजे ते मला फक्त घरात येताना आणि घरातून बाहेर जाताना दिसतात. ते मला रोज दिसतात. पण त्यांना पकडून माझ्याबरोबर वेळ घालवायचा किंवा मस्ती करायची असं करताच येत नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला हे त्यांच्याबाबतीत आहे".

या मुलाखतीमध्ये सोनाली त्यांना विचारलं की "देवेंद्रजी रोमॅंटिक आहेत का?"  यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, "नाही". यावर सोनालीने पुन्हा विचारलं "मग आधी होते का?" त्यावर अमृता म्हणाल्या, "कधीच नव्हते. लग्नाआधीही नव्हते आणि आताही नाहीत. ते खूप व्यावहारिक आहेत आणि मी रोमॅंटिक आहे. त्यांना रोमान्स जमतही नाही कळतही नाही. त्यांना राजकारण सोडून काही कळत नाही".

देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचा विवाह २००५ साली झाला होता. हे दोघं नेहमीच सर्वांना कपल गोल्स देताना दिसतात. अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी त्या कायम पती देवेंद्र फडणवीस यांची खंबीरपणे साथ देताना दिसून येतात. अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सतत चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  गाणी, अल्बम्स यासह रोखठोक भूमिकांसाठीदेखील अमृता फडणवीस ओळखल्या जातात.  

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसराजकारण