२०१८ मध्ये अमृता आपल्याला एकामागोमाग एक हिंदी सिनेमामध्ये काम करताना दिसणार आहे. मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे.आगामी काळात मराठी सिनेमासोबतच काही हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात झळकलेली अमृता आता पुन्हा एका नवीन सिनेमात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात अमृताने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ आणि त्यानंतर ‘डॅमेज’ या वेब सिरीजमधील ‘लोव्हीना’ हे सिरीयल किलरचे पात्रं साकारले. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे. अमृतासाठी सरिताची भूमिका ही अगदी सोपी होती,यासाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाही. कारण ख-या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. जसे की आपली अमृता जशी खोडकर, मस्तीखोर, प्रेमळ तशीच सरिता देखील आहे. विशेष म्हणजे काय बरोबर, काय चूक याची योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे. या चित्रपटाच्या आणि भूमिकेच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मनोज बाजपेयी आणि मनमिळावू अमृता यांची पती-पत्नीची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
अमृता मराठी, हिंदीमधील विविध शोमध्येही बिझी असते.बिझी शेड्युअलमधून वेळात वेळ काढुन ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. कायमच ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.