मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. अगदी रोज प्राजक्ताला सोशल मीडियावर लग्नाचे प्रपोजल येतात. तिच्या क्रेझी फॅन्सची संख्या तर विचारू नका. एका अशाच क्रेझी चाहत्याचा किस्सा प्राजक्ताने नुकताच शेअर केला. हा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
लोकमत फिल्मीच्या My 1st With Prajakta Mali या मुलाखतीच्या कार्यक्रमात प्राजक्ताने तिच्या चाहत्याचा एक क्रेझी किस्सा शेअर केला. पहिली फ्लाईट, पहिला फसलेला पदार्थ, पहिला प्रपाेज असे अनेक खुलासे तिने केलेत. विचित्र फॅन्सचा आलेला पहिला अनुभव? असा प्रश्न प्राजूला विचारण्यात आला. यावर एका चाहत्याने मला मुंग्यांची पावडर गिफ्ट दिल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, एका फॅनने मला मुंग्यांची पावडर गिफ्ट दिली होती. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, वगैरे असं त्याने खूप सजवलं आणि मग मला ती मुंग्यांची पावडर माझ्या हातात ठेवली. तू खूपच गोड आहेस, म्हणून तुला ही भेट असं तो मला म्हणाला. ओके.. थँक्यू म्हणून हसत हसत मी त्याची ती भेट स्वीकारली.
तुझा फसलेला पदार्थ? यावर ती म्हणाली, मी फार स्वयंपाक करत नाही. भाज्या चुकतात जरा. मी नॉनवेज खासचे तेव्हा मी केलेला चिकनचा पदार्थ विशेष फसला होता. पहिला लुक ज्याने फजिती झाली? यावर ती म्हणाली, जत्राच्या सेटवर असं घडलं होतं. आम्ही सगळे कॉस्च्युमनुसार रेडी झालो. कॉस्च्युमनुसार हेअरस्टाईल रेडी होतं. सगळं झालं आणि मी स्टेजवर गेले. पण डायरेक्टर सरांनी माझा तो ड्रेस रिजेक्ट केला. बरं नाही दिसत, जा चेंज कर, असं ते मला म्हणाले. मग १५ मिनिटांत जे हाताला लागेल तो ड्रेस मी घातला. आधीचा ड्रेस गंडला होताच पण दुसरा आणखीच गंडला.