आनंद अभ्यंकर यांच्या कुटुंबाला मिळणार ७२ लाखांची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:21 AM
लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे २४ डिसेंबर २०१२ ला मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झाले होते. उर्से ...
लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे २४ डिसेंबर २०१२ ला मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झाले होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावा जवळ अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष याचा देखील मृत्यू झाला होता. पुणे विद्यापीठाच्या आवारात कोकणस्थ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून रात्री नऊच्या सुमारास सर्वजण कोथरूड येथील घरी गेले होते. त्यानंतर मुंबईला परतत असताना पुण्याला जाणारा टेम्पो रस्ता दुभाजक तोडून अभ्यंकर असलेल्या मोटारीवर जाऊन धडकला. या वेळी आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसें, प्रत्युष यांच्यासोबतच अक्षयची पत्नी दिप्ती देखील गाडीत होती. दीप्ती आणि अभ्यंकर यांच्या मोटार चालकाला किरकोळ दुखापत झाली होती. आनंद अभ्यंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा केला होता. लोक न्यायालयात त्यातील ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. आनंद अभ्यंकर यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी सानिकाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका विश्वात साहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ती काम करतेय. शिवाय छोट्या पडद्यावरील ढोलकीच्या तालावर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सध्या ती शशी सुमीत प्रोडक्शन हाऊसमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत आहे. तिने आनंद अभ्यंकर यांच्यावर ब्लॉग देखील लिहिला असून या ब्लॉगचे रूपांतर पुस्तकात करण्यात आले आहे. अलाइव्ह असे त्या पुस्तकाचे नाव आहे. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. शुभंकरोती, या गोजिरवाण्या घरात या मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.