काल्पनिक आणि पौराणिक कथा आपल्या विलक्षण शैलीत शब्दबद्ध करून तमाम साहित्यप्रेमीमच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे आघाडीचे सिद्धस्थ लेखक आणि साऱ्या विश्वाला वेड लावण्याऱ्या नेटफ्लिक्सवरील 'बाहुबली' सिरीजचे लेखक आनंद नीलकंठन हे पहिल्यांदाच त्यांच्या विलक्षण शैलीतील 'ऑडिओ ड्रामा' घेऊन येत आहेत. स्टोरीटेल ओरिजनलसाठी त्यांनी "नल- दमयंती" या मूळ इंग्रजीतील नव्याकोऱ्या 'ऑडिओ ड्रामा' लेखन निर्मिती केली असून आता हा 'ऑडिओ ड्रामा' आपल्याला मराठीसह एकूण नऊ भारतीय भाषांमध्ये ऐकायला मिळणार आहे. मराठीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, कवी, गीतकार अभिनेते संदीप खरे यांच्या सुरस आवाजात ‘नल- दमयंतीचा ऑडिओ ड्रामा' ऐकण्यास मिळणार आहे.
रामायणा -महाभारतावर आधारित विविध काल्पनिक - पौराणिक विषयांची आधुनिक काळासोबत सांगड घालून पुर्नकथा - कादंबऱ्यांची निर्मितीत लोकप्रिय असलेले आजचे आघाडीचे लेखक आनंद नीलकंठन यांची वेगळी ओळख सांगायला नको. नेटफ्लिक्सवरील 'बाहुबली' सिरीज आणि 'असुर': टेल ऑफ द वॅनक्विश्डच्या' या पौराणिक कथा कल्पनांतून प्रेरणा घेऊन आधुनिक कादंबऱ्यांची निर्मिती करणाऱ्या आनंद नीलकंठन यांनी 'सिया के राम'(स्टार प्लस), 'चक्रवर्तीन अशोक सम्राट'(कलर्स टीव्ही), 'संकटमोचन महाबली हनुमान'(सोनी टीव्ही), 'अदालत-2' (सोनी टीव्ही), 'सरफरोश - सारागडीची लढाई' (नेटफ्लिक्स) या पौराणिक तसेच सामाजिक मालिकांचे लोकप्रिय पटकथाकार म्हणून आनंद नीलकंठन सर्वांना परिचित आहेत.
आनंद नीलकंठन यांची 'ऑडिओ ड्रामा' लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लेखनाचा अनुभव कथन करताना ते म्हणतात “ऑडिओ ड्रामा तयार करणे हा एक आव्हानात्मक अनुभव होता. मी कादंबर्या आणि स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत, पण ‘ऑडिओ ड्रामा’ लिहिणं वेगळं आहे कारण ऐकणार्याच्या मनात व्हिज्युअल तयार करू शकतील अशा आवाजांवरही ‘ऑडिओ ड्रामा’ लेखन करताना लक्ष केंद्रित करावं लागतं. "नल- दमयंती" या ऑडिओ ड्रामासाठी शब्दांची निवड करताना स्वतःचा कस लागला आहे. माझ्यासाठी हा एक नवीन शिकण्याचा अनुभव होता आणि मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”
"नल- दमयंती" ऑडिओ ड्रामा तुम्ही इंग्रजी आणि मराठी, हिंदी, बंगाली, आसामी, मल्याळम, तेलुगु, गुजराती आणि तमिळ या आठ प्रादेशिक भाषांमध्ये ऐकू शकता. अनेक भारतीय भाषांमध्ये एकाच वेळी हा ऑडिओ ड्रामा प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. “मी हे पुस्तक मुळात इंग्रजीत लिहिले आहे आणि स्टोरीटेलच्या टीमने ते तुमच्या भाषेत प्रकाशित करण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. एकाच वेळी एखादे पुस्तक अनेक भाषांमध्ये येत असण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल,” असे आनंद सांगतात.